कोल्हापूर: ऐन दिवाळीत काळाचा घाला, फराळ देऊन परतणाऱ्या तरुणीचा अपघाती मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 04:50 PM2022-10-25T16:50:53+5:302022-10-25T16:51:22+5:30
धडकेनंतर अज्ञात वाहनाचे चाक ऋतुजाच्या डोक्यावरून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला
गांधीनगर : पुणे - बंगळुरू महामार्गावर अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत ऋतुजा रवींद्र पंढरे (२३, रा. वळिवडे, ता. करवीर) या तरुणीचा जागीच मृत्यू झाला, तर गिरिजा रमेश पंढरे (१९, रा. वळिवडे) ही जखमी झाली. ही घटना रविवारी (दि. २३) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. याबाबत गांधीनगर पोलिसांत फिर्याद दाखल झाली.
अधिक माहिती अशी की, वळीवडेचे लोकनियुक्त सरपंच अनिल पंढरे यांच्या पुतण्या ऋतुजा आणि गिरिजा या उचगाव येथे दिवाळीच्या निमित्ताने पाहुण्यांना फराळ देऊन आपल्या इलेक्ट्रिक दुचाकीवरून घरी परतत होत्या. रात्री ९ वाजेच्या सुमारास पुणे-बंगळुरू महामार्गावरून उचगावहून तावडे हॉटेलकडे येत होत्या. महामार्गावरील रेल्वे पूल ओलांडून त्यापुढे आल्या त्याचवेळी मागून येणाऱ्या भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेनंतर अज्ञात वाहनाचे चाक ऋतुजाच्या डोक्यावरून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीवरून पडून गिरिजा ही जखमी झाली. गिरिजाला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.
ऋतुजा ही शालेय जीवनापासून हुशार अभ्यासू आणि मनमिळाऊ विद्यार्थिनी म्हणून परिचित होती. वळीवडे गावामध्ये झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनाची अध्यक्षा म्हणून तिने कार्य केले होते. सध्या ती स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होती. गांधीनगर पोलिसांत अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास सहायक फौजदार सुनील गायकवाड करत आहेत.