कोल्हापुरातील कणेरी मठ येथील गायींचा मृत्यू विषबाधेमुळे नाही, अन्नबाधेमुळे!, उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 06:18 PM2023-03-18T18:18:37+5:302023-03-18T18:19:37+5:30
मृत्यूंचे कारण शोधण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागास कळविण्यात आले आहे. त्याचबरोबर जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयामार्फत चौकशी समिती नेमण्यात आली आहे,
मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरीमठात ५२ नव्हे तर १२ गायींचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यू विषबाधेमुळे नव्हे तर अन्नबाधेमुळे झाला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली.
कणेरीमठावर पंचमहाभूत लोकोत्सवाचे आयोजन करण्यात आले असता या ५२ गायींना बाधा झाली, यापैकी ५२ गायींचा त्यात दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे तेथील नागरिकांत व राज्यातील जनतेत पसरलेला तीव्र असंतोष पसरला होता. शिळे अन्न खाल्ल्यामुळे ५२ गाईंना विषबाधा झाली व त्यामुळे १२ गाईंचा त्यात मृत्यू झाला असे भासविण्यात आले असले, तरी शिळे अन्न गाईंना खायला कोणी दिले? हा प्रश्न अनुत्तरीत असल्याबाबत अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे, विक्रम काळे आदी सदस्यांनी विधानपरिषद नियम ९ अन्वये सूचना दिली होती. त्यावर उपमुख्यमंत्र्यांनी निवेदन केले.
मठात २३ व २४ फेब्रुवारी या कालावधीत पोटफुगीमुळे गायी अत्यवस्थ झाल्या. या गायींवर तेथील पशुवैद्यक अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू केले. मात्र, उपचारादरम्यान १२ गायींचा मृत्यू झाला. या मृत्यूंचे कारण शोधण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागास कळविण्यात आले आहे. त्याचबरोबर जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयामार्फत चौकशी समिती नेमण्यात आली आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.