विजयसिंह मोरे यांच्या उतरकार्यादिवशीच कुटुंबीयांचा अवयवदानाचा संकल्प
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 07:03 PM2023-03-28T19:03:29+5:302023-03-28T19:03:44+5:30
दत्तात्रय लोकरे सरवडे : गोकुळ दूध संघाचे संचालक, बिद्री साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजयसिंह ...
दत्तात्रय लोकरे
सरवडे : गोकुळ दूध संघाचे संचालक, बिद्री साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोरे यांच्या उतरकार्यादिवशीच कुटुंबीयांनी अवयवदानाचा संकल्प केला. माने कुटुंबियांनी अवयवदानाचा संकल्प करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
विजयसिंह मोरे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावरती हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली होती. एका व्यक्तीने केलेल्या अवयवदानातून त्यांना हृदय उपलब्ध झाले होते. या गोष्टीतून प्रेरणा घेऊनच मोरे यांचे पुत्र रणधीर मोरे, विक्रमसिंह मोरे, स्नुषा संयोगिता मोरे, उत्कर्षा मोरे, पुतणे हर्षवर्धन मोरे, रोहित मोरे पुतणी ऋतुजा मोरे, निता पाटील, नातेवाईक राजश्री राणे यांनी अवयव दानाचा संकल्प केला.
समाजातील गरजू व्यक्तींना त्यांचे उर्वरित आयुष्य व्यवस्थित पार पाडण्यासाठी या अवयवांचा वापर होईल. जेणेकरून त्यांच्या कुटुंबाची हानी होणार नाही व त्या व्यक्तीला जीवदान प्राप्त होईल हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून हा संकल्प केला असल्याचे मोरे परिवारातील सदस्यांनी सांगितले.
याप्रसंगी बिद्री कारखानाचे अध्यक्ष, आमदार के. पी. पाटील म्हणाले की, मोरे घराण्याने जपलेला सामाजिक कार्याचा वसा नवीन पिढीने ही पुढे चालू ठेवला आहे आणि समाजासमोर हे एक उत्कृष्ट उदाहरण असून सर्वांनी यातून प्रेरणा घ्यावी असे मत व्यक्त केले. यावेळी बिद्रीचे संचालक प्रविणसिंह पाटील, सुनीलराज सूर्यवंशी, सुरेशराव सूर्यवंशी, डी. एस.पाटील, एस.पी.पाटील, उमर पाटील, बंधू डी. के. मोरे, आर.के.मोरे, जे.के.मोरे, दिग्विजयसिंह मोरे व इतर मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समिती अवयव दान संपत्ती पत्रानुसार त्यांनी हा संकल्प केला. या अवयवदानाचे संकल्प पत्र मोरे कुटुंबियांनी आरोग्य अधिकारी डॉक्टर माळवदे यांच्याकडे सुपूर्द केले. सदरच्या उपक्रमास सीपीआर रुग्णालय, कोल्हापूरचे जनसंपर्क अधिकारी बंटी सावंत, सुनिल दळवी, प्रा. अतुल कुंभार यांचे सहकार्य लाभले.