विधानसभा लढवण्याचा निर्णय राज्य कार्यकारिणी घेईल - राजू शेट्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2024 13:15 IST2024-06-22T13:14:33+5:302024-06-22T13:15:07+5:30
'शेतकऱ्यांना माझी भूमिका पटली नाही, म्हणूनच पराभव'

विधानसभा लढवण्याचा निर्णय राज्य कार्यकारिणी घेईल - राजू शेट्टी
कोल्हापूर : मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे, वडिलांचे कष्ट वाया जाऊ नये म्हणून अपेक्षा न ठेवता चळवळीत आलो. काहीतरी मिळावे म्हणून कधीच काम केले नाही. लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना माझी भूमिका पटली नसेल, म्हणून माझा पराभव झाला असावा. असे सांगत विधानसभा निवडणूक मी लढवावी की नाही, याबाबत राज्य कार्यकारिणीच्या बैठकीतच निर्णय होईल, अशी माहिती स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राजू शेट्टी म्हणाले, दोन दिवस बारामती येथे राज्य कार्यकारिणीची बैठक आहे. यामध्ये विधानसभेसह सर्वच गोष्टींवर चर्चा हाेऊन पुढील दिशा ठरवली जाणार आहे. ज्यांचा चळवळीशी काडीचाही संबंध नाही, अशांनी माझ्याबाबत बोलू नये.
ईडीला न घाबरता रस्त्यावर उतरा
साखरेच्या किमान हमीभावाबाबत आम्हीच केंद्र सरकारशी भांडण्याचा ठेका घेतलेला नाही. साखर कारखानदारांनी ईडीची भीती मनातून काढून रस्त्यावर उतरावे, असा टोला शेट्टी यांनी लगावला.
म्हणून सरकार खते अनुदानावर देते
लालबहाद्दूर शास्त्री हे पंतप्रधान असल्यापासून शेतकऱ्यांना रासायनिक खते अनुदानावर दिली जातात. शेतकऱ्यांनी पिकवलेला माल जीवनाश्यक वस्तू म्हणून त्याचे भाव नियंत्रित ठेवत असाल तर त्याची जबाबदारीही सरकारला घ्यावी लागते, हा कायदा केला होता. म्हणून सरकार खते अनुदानावर देते. पण, गेल्या दहा वर्षांत खतांचे दर किती झालेत? असा सवालही शेट्टी यांनी केला.