Kolhapur Crime: बनावट इन्स्टा अकाउंटद्वारे तरुणीची बदनामी, अश्लील मेसेज केले व्हायरल; संशयिताचा शोध सुरू
By उद्धव गोडसे | Published: March 15, 2023 12:49 PM2023-03-15T12:49:48+5:302023-03-15T12:50:26+5:30
आपले खासगी आयुष्य जगजाहीर करताना काळजी घेण्याची गरज
कोल्हापूर : पाचगाव (ता. करवीर) येथील एका तरुणीच्या नावाने इन्स्टाग्रामवर बनावट अकाउंट तयार करून अश्लील मेसेज व्हायरल करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तरुणीच्या पालकांनी मंगळवारी (दि. १४) करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सायबर पोलिसांच्या मदतीने संशयिताचा शोध सुरू आहे.
पाचगाव येथील एका तरुणीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरील काही फोटो घेऊन अज्ञाताने तिच्या नावाने बारा बनावट इन्स्टा अकाउंट तयार केली. त्यावर तरुणीचे मॉर्फ केलेले फोटो आणि अश्लील मेसेज पाठवले जात आहेत. ऑगस्ट २०२२ मध्ये पहिले बनावट अकाउंट लक्षात येताच संबंधित तरुणीच्या पालकांनी करवीर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार अर्ज दिला. तसेच तरुणीने तिचे फेसबूक आणि इन्स्टा अकाउंट बंद केले. गेल्या सहा महिन्यांपासून सोशल मीडियात तिचे एकही अकाउंट नसताना गेल्या १५ ते २० दिवसांपासून अज्ञात व्यक्तीने तिच्या नावाने इन्स्टाग्रामवर बनावट खाती तयार करून अश्लील मेसेज व्हायरल केल्याचे लक्षात आले.
याबाबत पीडित तरुणीने सायबर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. सायबर पोलिसांच्या सल्ल्यानुसार पीडित तरुणीच्या पालकांनी मंगळवारी करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन करवीर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अरविंद काळे यांनी तातडीने सायबर पोलिसांशी संपर्क साधून बनावट अकाउंट तयार करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याबद्दल चर्चा केली. लवकरच यातील संशयिताला पकडून त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती निरीक्षक काळे यांनी दिली.
जाणीवपूर्वक बदनामी..
बनावट इन्स्टा अकाउंटवर पीडित मुलीचे फोटो इतर तरुणांसोबत एडिट करून शेअर केले आहेत. अश्लील भाषेत मजकूर लिहून चारित्र्यहनन केले आहे. तरुणीचे मित्र आणि नातेवाईकांनाही आक्षेपार्ह मेसेज पाठवले आहेत. त्यामुळे कुणीतरी जाणीवपूर्वक बदनामीचा प्रकार केला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.
उठसूठ फोटो शेअर करू नका..
हल्ली तरुण मुली हॉटेलमध्ये चहा प्यायला गेल्या तरी तिथे फोटो काढून लगेच स्टेटसला लावतात. फेसबूकपासून अनेक प्लॅटफाॅर्मवर शेअर करतात. तसे करणे धोक्याचे आहे. त्याचा कोणत्याही कारणांसाठी गैरवापर होतो. त्यामुळे असे आपले खासगी आयुष्य जगजाहीर करताना काळजी घेण्याची गरज आहे.