हवाई अंतर कमी करणे कारखानदारीच्या मुळावर, नेमका फायदा काय हे स्पष्ट होण्याची गरज 

By विश्वास पाटील | Published: June 17, 2023 01:40 PM2023-06-17T13:40:59+5:302023-06-17T13:41:19+5:30

शेतकरी संघटनांतील वर्चस्वाच्या राजकारणात साखर कारखानदारीचे वांगे होईल, असा आग्रह धरणे चुकीचे आहे.

The demand to relax the air distance of 25 km between the two sugar mills is problematic for the sugar mills | हवाई अंतर कमी करणे कारखानदारीच्या मुळावर, नेमका फायदा काय हे स्पष्ट होण्याची गरज 

हवाई अंतर कमी करणे कारखानदारीच्या मुळावर, नेमका फायदा काय हे स्पष्ट होण्याची गरज 

googlenewsNext

विश्वास पाटील

कोल्हापूर : दोन साखर कारखान्यांतील हवाई अंतराची २५ किलोमीटरची अट शिथिल करण्याची मागणी साखर कारखानदारीच्या मुळावर उठणारी आहे. दोन्ही काँग्रेसच्या वर्चस्वाखाली असलेल्या साखर कारखानदारीत आता निम्मे कारखाने भाजपचे झाले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडूनच या निर्णयास विरोध होऊ शकतो. शेतकरी संघटनांतील वर्चस्वाच्या राजकारणात साखर कारखानदारीचे वांगे होईल, असा आग्रह धरणे चुकीचे आहे.

रयत शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन ही मागणी केली आहे. त्यांनी त्यांच्या स्वभावानुसार समिती नेमण्याची घोषणा करून टाकली आहे. परंतु, सध्याच्या महाराष्ट्रातील साखर हंगामाचा विचार केल्यास कितीही ऊस झाला तरी कधीही गाळपाविना ऊस शिल्लक राहिला अशी स्थिती उदभवलेली नाही. मागील दहा वर्षांत फक्त २०२१-२२ च्या हंगामातच सरासरी गाळप १७३ दिवस झाले आहे. सोलापूर, अहमदनगर व मराठवाड्यात चांगला पाऊस झाला की त्यावर्षी गाळप दोनशे टक्के वाढते व पावसाने ओढ दिल्यास ते पन्नास टक्क्यांवर येते. तसे या हंगामात झाल्याने गाळप वाढले. तो अपवाद वगळता कधीच १५० पेक्षा जास्त गाळप झालेले नाही. सरासरी १६० दिवस कारखाना सुरू राहिला तरच तो आर्थिकदृष्ट्या परवडतो. अन्यथा तब्बल २७५ दिवस कायम कामगारांचा पगाराचा बोजा सहन करावा लागतो. 

हंगाम कितीही दिवस चालला तरी त्याच्या मेंटेनन्ससाठी येणारा खर्च तेवढाच असतो. प्रत्येक जिल्ह्यातील दोन-तीन कारखाने बंद असूनही एकही टन ऊस शिल्लक राहत नाही. नजिकच्या काळात कोणत्याच जिल्ह्यात नव्या सिंचन योजना होणार नसल्याने ऊस क्षेत्र वाढणार आहे, अशीही स्थिती नाही. उसाची पुरेशी उपलब्धतता नसताना मग नुसतेच कारखाने वाढवण्यात मागणी करणाऱ्यांचा व शासनाचाही काय फायदा आहे हे स्पष्ट होण्याची गरज आहे.

मागील हंगामातील सरासरी गाळप दिवस

कोल्हापूर : १२४, पुणे : १३२, सोलापूर : ११८, अहमदनगर : १२१, औरंगाबाद : १२४, नांदेड : ११७, अमरावती -९६ आणि नागपूर-१०० :

महाराष्ट्रातील साखर उद्योगाची सद्य:स्थिती

सहकारी साखर कारखाने - १०६
खासगी कारखाने - १०४
प्रतिदिन गाळप क्षमता : ८ लाख ८२ हजार ५५०.
एकूण ऊस गाळप : १० कोटी ५२ लाख
साखर उत्पादन : १ कोटी ५३ लाख टन
सरासरी गाळप दिवस : १२१

हवाई अंतराची अट शिथिल करण्याची मागणी साखर कारखानदारीस मारक आहे. एकेकाळी 180 दिवस चालणारा साखर हंगाम आता कसा बसा 100 दिवसावर आला आहे.. अनेक कारखाने गाळप क्षमता वाढवत आहेत. सहकारी साखर कारखानदारी नेहमीच स्पर्धात्मक राहिली आहे. त्यामुळे आत्ता हवाई अंतर कमी करून कारखाने वाढवल्यास चांगले चाललेले कारखाने ऊसा अभावी अडचणीत येतील. - समरजीत घाटगे, अध्यक्ष, शाहू साखर कारखाना, कागल

Web Title: The demand to relax the air distance of 25 km between the two sugar mills is problematic for the sugar mills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.