पुढील चाळीस दिवसांत थेट पाइपलाइन योजना पूर्ण होणार
By भारत चव्हाण | Published: July 9, 2023 06:28 PM2023-07-09T18:28:27+5:302023-07-09T18:28:34+5:30
१ ऑगस्टपासून योजनेची चाचणी, साडेदहा लाख लोकसंख्येला पाणी देण्याची क्षमता
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : कोल्हापूर शहराला २०४५ सालापर्यंत साडेदहा लाख लोकसंख्येची पिण्याच्या पाण्याची तहान भागविण्याची क्षमता असलेल्या काळम्मावाडी थेट पाइपलाइन योजनेची सर्व कामे दि. ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार आहेत. धरण क्षेत्रात योजनेच्या कामाची धांदल उडाली असून जॅकवेलमध्ये पोहोचलेल्या पाण्याचा उपसा जलवाहिनी स्वच्छ करण्याकरिता केला जात आहे. रविवारी धरण क्षेत्रात माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते नवीन पाण्याचे पूजन करण्यात आले.
रविवारी आमदार सतेज पाटील यांनी आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव यांच्यासह माजी नगरसेवकांच्या सोबत काळम्मावाडी धरण क्षेत्रात जाऊन थेट पाइप लाइन योजनेच्या कामाचा आढावा घेतला. तेथे सुरू असणाऱ्या सर्व कामांची त्यांनी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांना माहिती दिली.
कोल्हापूरकरांचे स्वप्न असलेल्या थेट पाइपलाइन योजनेचे काम पूर्णत्वाकडे जात असल्याचे पाहून आमदार पाटील यांचे मन भारावून गेले. त्यांनी पाण्याकडे पाहून हात जोडले. यावेळी उपस्थित असणाऱ्या सर्वच माजी नगरसेवकांनी योजनेच्या कामासाठी केलेल्या पाठपुराव्याबद्दल त्यांचे कौतुक केले.
योजनेसाठी काळम्मावाडीपासून कोल्हापूर शहरातील पुईखडी जलशुध्दीकरण केंद्रापर्यंतच्या ५३ किलोमीटर अंतरात जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. तसेच टाकलेल्या जलवाहिनीची आतून स्वच्छता करण्याचे काम सुरू होऊन २२ किलोमीटरपर्यंत ते पूर्णही झाले आहे. आता ३१ किलोमीटर जलवाहिनी स्वच्छ करण्याचे काम जुलै महिन्याअखेर पूर्ण होणार आहे. विशेष म्हणजे आतून पाइप स्वच्छ करण्यासाठी नव्याने बांधलेल्या जॅकवेलमधील पाणी उपसा केला जात आहे.
बिद्री येथे साडे चार किलोमीटर अंतरात भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याचे काम सुरू झाले असून ते पंधरा दिवसांत पूर्ण होत आहे. बिद्री ते काळम्मावाडी २७ किलोमीटर विद्युत वाहिनी टाकण्याचे काम या महिन्याअखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.
धरण क्षेत्रात दोन जॅकवेल उभारण्यात आली आहेत. दोन्ही जॅकवेलची कामे पूर्ण झाली आहेत. एका जॅकवेलवर उपसा पंप जोडण्यात येत आहेत, तर एक पंप हाऊसच्या स्लॅबचे काम तसेच उपसा पंप जोडण्याचे काम सुरू झाले आहे. या कामाला एक महिना लागण्याची शक्यता आहे.