Kolhapur politics: वारं फिरलंय, राजकारणाची दिशाही बदलणार; पण..

By समीर देशपांडे | Published: November 26, 2024 01:01 PM2024-11-26T13:01:00+5:302024-11-26T13:01:59+5:30

महायुती ‘एक है तो सेफ है’, नेत्यांचेही राहणार लक्ष

The direction of politics in Kolhapur district will change | Kolhapur politics: वारं फिरलंय, राजकारणाची दिशाही बदलणार; पण..

Kolhapur politics: वारं फिरलंय, राजकारणाची दिशाही बदलणार; पण..

समीर देशपांडे

कोल्हापूर : कधी नव्हे इतकं जिल्ह्यात काँग्रेस आणि मित्रपक्षांचं पानिपत झालं आहे. राज्यातीलच वारं फिरल्यामुळे आता जिल्ह्यातील राजकारणाची दिशा बदलणार हे निश्चित. या बदललेल्या परिस्थितीचा फायदा उठवत जिल्ह्यातील एक-एक सत्तास्थाने ताब्यात घेण्यासाठी महायुती सरसावणार आहे; परंतु ‘एक है तो सेफ है’ या ब्रीदवाक्यानुसार जर महायुतीचे नेते वागणार नसले तरी येणाऱ्या काही महिन्यांत पिछाडीवर गेलेला महाविकास आघाडीचा वाघ पुढे येणारच नाही, असे समजण्याचे कारण नाही.

‘एक है तो सेफ है’ हे स्लोगन यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पुढे आले असले तरीही याचे महत्त्व नेते हसन मुश्रीफ, सतेज पाटील आणि विनय कोरे हे पूर्वीपासून जाणून आहेत. त्यामुळेच सतेज पाटील मुश्रीफ यांच्याविरोधात प्रचाराला गेले नाहीत हे उघड सत्य आहे. त्यांचे खंदे समर्थक उमेश आपटे हे मुश्रीफ यांच्या पाठीशी राहिले हे दुसरे सत्य. यातूनच सत्यजित पाटील एकाकी पडल्याची चर्चा आहे. त्यामुळे राज्यातील सत्ता कोणाची असली तरी जिल्ह्यातील विविध सत्तास्थानांवरील मांड हे तिघे कधीच ढिली होऊ देत नाहीत. काहीवेळा जिल्हा परिषदेसारखा अपवाद मध्ये येतो.

या विधानसभेच्या निमित्ताने महाविकास आघाडीचा सुफडा साफ झाला असताना महायुतीच्या नेत्यांच्या अंगात विजयाचे वारे संचारले आहे. ‘गोकुळ’, ‘महापालिका’, जिल्हा परिषद’ ताब्यात घेण्यासाठी नेते आसुसलेले आहेत. तशी इच्छा असणे यात वावगे काहीच नाही. कारण केंद्र आणि राज्यातील सत्तेचा पुरेपूर वापर करीत स्थानिक स्वराज्य आणि अन्य सहकारी संस्था ताब्यात घेण्याची परंपरा आपल्याकडे खूप जुनी आहे.

आता जिल्ह्यातील १० पैकी ७ जण हे अनुभवी आणि ज्येष्ठ आमदार आहेत. यातील तिघांनी मंत्री म्हणूनही काम केले आहे. यातील एकाला कॅबिनेट मंत्रिपदाचा, तर दुसऱ्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा होता. तरीही आता मंत्रिपदासाठी प्रचंड स्पर्धा आहे. त्यातून धुसफूस होऊ शकते. ती न वाढवण्यासाठी महायुतीची राज्यस्तरीय नेतेमंडळी खंबीर आहेत; परंतु धुसफूस, समज, गैरसमज यातून मग समाधानकारक तोडगा निघाला नाही आणि न ऐकण्याची वृत्ती वाढली की मग वेगळेच चित्र निर्माण झाले होते.

कोल्हापूर महापालिकेला भाजपच्या स्थानिक नेत्यांशी न पटल्याने राजेश क्षीरसागर शिवसेनेच्या नगरसेवकांना घेऊन काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेले होते हे जिल्ह्याने पाहिले आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेत पाठिंबा देण्यावरून महायुती सत्तेत असतानाही शिवसेना फुटली होती हे देखील वास्तव आहे. त्यामुळेच अधिक दक्षता घ्यावी लागेल.

समोर सतेज पाटील यांच्या रूपाने जखमी शेर आहे. कोणत्या विधानसभा मतदारसंघात नेमके काय झाले आहे, याचे विश्लेषण त्यांनी केलेलेच असणार आहे. महापालिकेच्या कोणत्या प्रभागात नेमकी ‘जादू’ काय झाली हे त्यांच्यापर्यंत गेलेले आहे. हातकणंगले, शिरोळ, चंदगड अशा किचकट ठिकाणी पालकमंत्री असताना अजिंक्यताऱ्यावर निधीसाठी फेऱ्या घालणाऱ्यांनी नेमकं काय केलं आहे याचा ‘हिशेब’ त्यांच्याकडे आहे. या एकतर्फी विजयामुळे दुखावलेल्या सर्वांना एकत्र करण्याची क्षमता पाटील यांच्यात आहे. त्यामुळेच महायुतीच्या नेत्यांना ‘आता काय अडचण’ नाही, अशा भ्रमात राहता येणार नाही.

सर्वांचे समाधान कसे करणार?

जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका पुढच्या वर्षीच्या सुरुवातीपासून होणार आहेत. महायुतीकडे इच्छुकांची संख्या साहजिकच अधिक आहे. स्थानिक पातळीवर राजकारण टोकाचे होत संधी न मिळालेले अनेकजण विरोधात जाऊ शकतात. त्यामुळे सर्वांचे नसले तरी अधिकाधिक जणांचे समाधान करण्याची कसरत महायुतीच्या नेत्यांना करावी लागणार आहे.

मावळत्या जिल्हा परिषदेतील बलाबल

भाजप १४, काँग्रेस १४, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित ११, शिवसेना एकत्रित १०, जनसुराज्य शक्ती ६, ताराराणी आघाडी २, आवाडे गट ३, युवक विकास आघाडी २, स्वाभिमानी २, अपक्ष १.

मावळत्या महापालिकेतील बलाबल

काँग्रेस ३०, राष्ट्रवादी एकत्रित १४, ताराराणी आघाडी १९, भाजप १४, शिवसेना एकत्रित ४

नेत्यांनाही दाखवावी लागणार ताकद

आता जे निवडून आले आहेत त्यांना एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी पाठबळ दिलेले आहे. राज्यातील परिस्थितीचा फायदा घेत हेच नेते जिल्ह्यातील महायुतीचे खासदार, आमदार यांंच्यावरही जबाबदारी टाकणार असून त्यावर त्यांचे लक्षही राहणार आहे.

Web Title: The direction of politics in Kolhapur district will change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.