‘गोकुळ’च्या अध्यक्ष पदासाठी अरुण डोंगळेंच्या नावाला संचालकांचाच विरोध, नेत्यांसमोर पेच
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 12:20 PM2023-05-13T12:20:37+5:302023-05-13T12:20:56+5:30
अध्यक्ष विश्वास पाटील यांची मुदत उद्या, रविवारी संपत आहे
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्ष पदासाठी ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांच्या नावाला संचालकांचाच विरोध असल्याचे समजते. काही संचालकांनी थेट नेत्यांच्या कानावरच ही गोष्ट घातली असून, संघाचा अध्यक्ष करणार असाल तर इतर कोणालाही करा, असा आग्रह धरल्याचे समजते. मात्र, दोन वर्षांनंतर डोंगळे यांनाच अध्यक्ष करण्याचा दिलेल्या शब्दाचे काय करायचे? असा पेच नेत्यांसमोर आहे.
‘गोकुळ’मध्ये आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली दोन वर्षांपूर्वी सत्तांतर झाले. ‘गोकुळ’मध्ये सत्तांतर घडविण्यात ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील व अरुण डोंगळे यांचे बंड महत्त्वपूर्ण ठरले होते. त्यामुळे पहिल्या दोन वर्षांसाठी विश्वास पाटील यांना तर त्यानंतर दोन वर्षे अरुण डोंगळे यांना संधी देण्याची घोषणा त्यावेळी नेत्यांनी केली होती. अध्यक्ष विश्वास पाटील यांची मुदत उद्या, रविवारी संपत आहे. त्यामुळे गेला महिनाभर अरुण डोंगळे यांनी नेत्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत.
मात्र, डोंगळे यांना अध्यक्ष करण्यास संचालकांचाच विरोध असल्याचे समजते. काही संचालकांनी नेत्यांची भेट घेऊन तसे कानावर घातले आहे. पहिली दोन वर्षे काॅंग्रेसचे विश्वास पाटील यांना संधी दिल्याने आता राष्ट्रवादी काॅंग्रेसकडे अध्यक्षपद येणार आहे. राष्ट्रवादीकडून डोंगळे यांच्यासह नवीद मुश्रीफ, प्रा. किसन चौगले, रणजितसिंह पाटील ही नावे पुढे येत आहेत.
विरोध कमी करण्यासाठी ‘नवीद’च योग्य
सध्या शौमिका महाडिक यांनी ‘गोकुळ’च्या कारभारात अधिक लक्ष देत चौकशी लावली आहे. महादेवराव महाडिक यांचा विद्यमान अध्यक्ष विश्वास पाटील यांच्यासह अरुण डोंगळे यांच्यावर राग आहे. डोंगळे यांना अध्यक्ष केले तर महाडिक ताकदीने पाठीमागे लागू शकतात. त्याऐवजी नवीद मुश्रीफ यांना अध्यक्ष केले तर त्यांचा आक्रमकपणा कमी होऊ शकतो, असे गणितही काही संचालकांनी नेत्यांसमोर मांडल्याचे समजते.
संचालकांसमवेत नेत्यांची आज बैठक
संघाच्या संचालकांसमवेत आज, शनिवारी नेत्यांची बैठक आहे. यामध्ये संचालकांची मते आजमावून घेतली जाणार आहेत. त्यानंतरच अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
तोपर्यंत विश्वास पाटील यांनाच कायम ठेवा
संघाच्या मागे लागलेली चौकशी व सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा हालवून जाम केलेला खुट्टा पाहता, यापुढे भाजप आक्रमक होणार आहे. अशा पार्श्वभूमीवर नवीन अध्यक्ष निवड सत्तारुढ गटाला डोकेदुखी ठरू शकते. त्यामुळे हे शांत होईपर्यंत विश्वास पाटील यांनाच कायम ठेवावे, असा मतप्रवाह पुढे येत आहे.