चांदोली विस्थापित मूळ गावाकडे परतू लागले; कोल्हापुरात गेले ३२ दिवस होता ठिय्या
By संदीप आडनाईक | Published: February 29, 2024 07:30 PM2024-02-29T19:30:31+5:302024-02-29T19:31:18+5:30
कोल्हापूर : गेले ३२ दिवस आपल्या मागण्यांवर ठाम राहिलेल्या चांदोली विस्थापितांना अखेर सरकारी यंत्रणेपुढे पराभव पत्करावा लागला. इतके दिवस ...
कोल्हापूर : गेले ३२ दिवस आपल्या मागण्यांवर ठाम राहिलेल्या चांदोली विस्थापितांना अखेर सरकारी यंत्रणेपुढे पराभव पत्करावा लागला. इतके दिवस वनविभागाच्या दारात ठिय्या मांडून बसलेल्या प्रकल्पग्रस्तांचा बांध फुटल्यामुळे त्यांनी आता थेट मूळ गावाकडे चालत जाण्यास प्रारंभ केला. बुधवारपासून चालायला सुरुवात केलेल्या या आंदोलकांनी गुरुवारी निवळे वाठार तर्फ वडगावात मुक्काम केला.
मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर गेले ३२ दिवस आंदोलन करणाऱ्या सुमारे ८०० हून अधिक चांदोली अभयारण्यग्रस्तांनी बुधवारी १०० प्रकल्पग्रस्तांना वनविभागासमोर ठिय्या आंदोलन करण्यासाठी मागे ठेवून मूळ गावी चालत जाण्याचा पर्याय स्वीकारला. बुधवारी या आंदोलकांची राहण्याची तसेच जेवणाची व्यवस्था शालन पाटील यांनी केली. गुरुवारी सकाळी टोप संभापूर या ठिकाणी पेठ वडगाव सोनाळी येथील केजीएन कमिटीने आंदोलकांना जेवणाची व्यवस्था केली तर निवळे वाठार तर्फे वडगावच्या ग्रामकमिटीने त्यांची गुरुवारी रात्रीची जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था केली.
नवे पारगाव येथील शेतकरी आंदोलकांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी आज, शुक्रवार दि. १ मार्च रोजी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या जेवणाची व्यवस्था नवे पारगाव येथे माजी सभापती प्रदीप राजाराम देशमुख आणि नवे पारगावचे सरपंच करणार आहेत. आंदोलकांचे साहित्य नेण्यासाठी गाडीची व्यवस्था प्रदीप पाटील यांनी केली आहे.
या आंदोलनात मारुती पाटील, दाऊद पटेल, रफिक पटेल, आनंदा आमकर, विनोद बडदे, एम. डी. पाटील, जगन्नाथ कुडतुडकर, नजीर चौगुले, पांडुरंग कोठारी, पांडुरंग पवार, दगडू बोडके, प्रदिप पाटील, शामराव उंडे, शामराव पाटील, दगडू टेलर, सुभाष पाटील उपस्थित होते.