तोल जाऊन चालत्या ट्रॅक्टरमधून चालक खाली पडला, ट्राॅलीचे चाक डोक्यावरून गेल्याने झाला जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 07:42 PM2022-02-07T19:42:03+5:302022-02-07T19:42:23+5:30
सरवडे : निपाणी-राधानगरी या मार्गालगत मांगेवाडी (ता.राधानगरी) या गावानजीक चालत्या उसाच्या ट्रॅक्टरमधून तोल जाऊन चालक खाली पडला. याचवेळी ट्राॅलीचे ...
सरवडे : निपाणी-राधानगरी या मार्गालगत मांगेवाडी (ता.राधानगरी) या गावानजीक चालत्या उसाच्या ट्रॅक्टरमधून तोल जाऊन चालक खाली पडला. याचवेळी ट्राॅलीचे चाक डोक्यावरून गेल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. मोघर्डे (ता.राधानगरी) येथील जितेंद्र भीमराव कांबळे (वय.३०) असे या मृत्यू चालकाचे नाव आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कसबा तारळे येथील शिवाजी लक्ष्मण जाधव यांच्या मालकीचा ट्रॅक्टर एम.एच.०९ एफ.जे.२२४०हा रिलायबल शुगर फराळे कारखान्यास ऊस वाहतुकीसाठी लावण्यात आला होता. या ट्रॅक्टरवर जितेंद्र काबंळे चालक म्हणून काम करत होते. आज ते ऊसाची ट्राॅली घेवून निघाले असता मांगेवाडी गावानजीक चालत्या ट्रॅक्टरमधून त्यांचा तोल गेला.
तोल गेल्याने ते खाली पडले असता जितेंद्र कांबळे याचा डोक्यावरून ट्राॅलीचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. कांबळे हे अविवाहित असून त्यांच्या पश्चात आई, भाऊ व भावजय असा परिवार आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालय सोळांकूर येथे करण्यात आले. सदर अपघाताची नोंद राधानगरी पोलिसात झाली असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विजयसिंह घाडगे, बजरंग पाटील, प्रमोद पाटील करीत आहेत.