चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव कार घुसली खासगी रुग्णालयात, चालक ठार; कोल्हापुरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 05:06 PM2022-05-05T17:06:11+5:302022-05-05T17:11:04+5:30
रात्रीच्यावेळी शांत वातावरणात जोराचा आवाज आल्याने परिसरातील नागरिक घराबाहेर आले. या दुर्घटनेत चालक दड्डीकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
कोल्हापूर : भरधाव मोटारीवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याकडेच्या फुटपाथवरून थेट खासगी हॉस्पिटलची सुरक्षा भिंत पाडून शेडमध्ये घुसली. आज, गुरुवारी पहाटे घडलेल्या या दुर्घटनेत कारचालक ठार झाला. अमित रमेश दड्डीकर (वय ३८, रा. विश्वकर्मा हाैसिंग सोसायटी, जवाहरनगर) असे ठार झालेल्याचे नाव आहे. या दुर्घटनेत मोटारकारसह हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या दोन दुचाकींचेही मोठे नुकसान झाले.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अमित दड्डीकर हे सराफ व्यावसायिक असून, त्यांचे दैवज्ञ बोर्डिंगनजीक सराफाचे दुकान आहे. बुधवारी रात्री ते आपल्या कारमधून कामानिमित्त घराबाहेर पडले. त्यानंतर ते पहाटेच्या सुमारास ध्यानचंद हॉकी स्टेडियमकडून रिंगरोडमार्गे जवाहरनगरकडे घरी परतत होते.
यावेळी त्यांचा धावत्या मोटारीवरील ताबा सुटल्याने ती रस्त्याकडेच्या फुटपाथवरुन सिद्धांत हॉस्पिटलबाहेरील पार्क केलेल्या दुचाकी उडवत सुरक्षा भिंतीला धडकून शेजारील ऑक्सिजन शेडमध्ये घुसली. या अपघातात हॉस्पिटलची भिंत पडली, यामुळे मोठे नुकसान झाले.
रात्रीच्यावेळी शांत वातावरणात जोराचा आवाज आल्याने परिसरातील नागरिक घराबाहेर आले. या दुर्घटनेत चालक दड्डीकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने नागरिकांनी त्यांना १०८ रुग्णवाहिकेतून उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. अमित यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई, वडील, दोन बहिणी, आत्या असा परिवार आहे.