चिकूच्या कुळातील ‘एग फ्रुट’ वृक्षाची कोल्हापुरात प्रथमच नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 04:16 PM2022-08-03T16:16:57+5:302022-08-03T16:17:27+5:30
कोल्हापुरात प्रथमच हा वृक्ष आढळल्याने त्याची नव्याने नोंद करण्यात येत आहे.
कोल्हापूर : कोल्हापुरातील रत्नाप्पा कुंभारनगर मोरेवाडी परिसरात शशिकला राणे यांच्या घराच्या कुंपणाबाहेर आंब्यासारखी फळे लागलेला वृक्ष वृक्षप्रेमी परितोष उरकुडे यांना निरीक्षण करताना नजरेस पडला. या वृक्षाची शास्त्रीय ओळख वनस्पतीतज्ज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर यांनी पटवली असून, हा एग फ्रुट विदेशी वृक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र कोल्हापुरात प्रथमच हा वृक्ष आढळल्याने त्याची नव्याने नोंद करण्यात येत आहे.
शशिकला राणे यांनी कांही वर्षांपूर्वी या वृक्षाचे रोप कालिकत येथून आणले होते. हे रोप आंबा आणि फणस यांची संकरित जात होती, अशी माहिती रोपवाटिका मालकाने दिल्याचे उरकुडे यांना राणे यांनी सांगितले. याच्या फळांफुलांचे, फांद्यापानांचे फोटो त्यांनी डॉ. बाचूळकर यांच्याकडे पाठविले तेव्हा संदर्भग्रंथातून या वृक्षाची ओळख त्यांनी पटविली.
‘एग फ्रुट’ या इंग्रजी नावाने ओळखल्या जाणाऱ्या या विदेशी वृक्षाचे नाव पाउटेरिया कॅम्पिचिएना असे असून, हा चिकूच्या म्हणजेच सॅपोटेएसी कुळातील आहे. याला यलो सॅपाटी, कपकेक फ्रुट व कॅनिस्टेल अशीही नावे आहेत. हा मूळचा मध्य अमेरिकेतील मेक्सिकोमधील आहे. याचे वृक्ष सॅल्वाडोर, गौतेमाला या जंगलांत नैसर्गिकपणे वाढतात. फळांसाठी याची लागवड कोस्टारिका, ब्राझिल, अमेरिका, नायजेरिया, ऑस्ट्रेलिया, कंबोडिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया, फिलिपाइन्स, श्रीलंका तसेच आपल्याकडे केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, गोव्यात करण्यात आली आहे.
म्हणूनच त्याला ‘एग फ्रुट’ म्हणतात
‘एग फ्रुट’ हा लहान ते मध्यम आकाराचा सदाहरित वृक्ष दहा मीटरपर्यंत उंच वाढतो. फांद्या पसरणाऱ्या व काही खाली झुकलेल्या असतात. पाने साधी, एकाआड एक, टोकाकडे एकवटलेली रुंद, व्यस्त अंडाकृती आकाराची, देठाकडे अरुंद व गोलसर असतात. पाने खुडल्यावर पांढरा चीक येतो. फुले लहान, द्विलिंगी, फिकट पिवळसर व मळकट तपकिरी रंगाची, सुवासिक असतात. बेचक्यातून एकांडी व गुच्छाने येतात. पाकळ्या पाच ते सहा, एकमेकांस चिकटलेल्या असून, त्यावर रेशमी लव असते.
फळे गोलाकार व देठाकडे फुगीर तर पिकलेली फळे नारिंगी, पिवळसर रंगांची असतात. आतील गर पिवळसर असून, फळात दोन ते सहा काळसर, करड्या रंगाच्या लांबट, गोलाकार बिया असतात. त्या हुबेहूब चिकूच्या बियांप्रमाणे दिसतात. पिकलेली फळे, उकडून टरफल काढलेल्या अंड्याप्रमाणे होतात, म्हणूनच त्याला ‘एग फ्रुट’ म्हणतात. याच्या बियांपासून रोपनिर्मिती होते.