फ्लॉवर, ढबू, हिरवी मिरची...; ही बाजारातून आणायच्या भाज्यांची लिस्ट नाही, ही आहेत निवडणूक चिन्हं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 04:17 PM2024-10-24T16:17:01+5:302024-10-24T16:26:29+5:30
विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारांसाठी १९० चिन्हे जाहीर
कोल्हापूर : हिरवी मिरची, नरसाळे, झगा, पॅन्ट, फणस, प्लॉवर, कोल्हापुरी पायताण, उड्या मारण्याची दोरी, कॅरम, स्वीच बोर्ड, लोकर व सुई, पक्कड, ड्रील मशीन.. अहो तुम्हाला ही घरातील साहित्यांची यादी वाटत असेल तर जरा थांबा. या दैनंदिन गरजेच्या वस्तू कितीही महाग झाल्या असल्या तरी निवडणूक आयोगाने मात्र विधानसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारांवर चिन्हांच्या रुपाने मुक्तहस्ताने उधळण केली आहे. यातील काही चिन्हे पारंपरिक, काही बदलत्या काळाला अनुसरून, तर काही अगदीच मजेशीर आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी अधिसूचना जाहीर होताच निवडणूक विभागाने विधानसभा मतदारसंघांसाठी अर्ज भरण्यात येणाऱ्या कार्यालयांबाहेर राष्ट्रीय पक्षांचे राखीव चिन्ह व अपक्ष उमेदवारांसाठीचे मुक्त चिन्हांचे मोठी चित्रच लावली आहेत. यातील बरीचशी चिन्हे अगदीच मजेशीर आहेत.
चिन्हांचा प्रभाव : ओळख आणि टवाळखोरीही
या निवडणूक चिन्हांचा मतांवर मोठा प्रभाव पडतो. उमेदवाराची फारशी माहिती नसलेला मतदार चिन्ह लक्षात ठेवून त्यासमोरील बटन दाबतो. लोकसभेला तुतारी आणि पिपाणीतील फरक न कळल्याने मोठा घोळ झाला होता. तुतारीऐवजी पिपाणीचा उमेदवार मते खाऊन गेला, असे बऱ्याच मतदारसंघात घडले. हे चिन्हच पुढील काही काळासाठी उमेदवाराची ओळख बनून राहते. काही वेळा त्यांना उमेदवारांकडून गमतीशीर विनोद आणि टवाळखोरीलाही सामोरे जावे लागते.
..अशी आहेत चिन्हे
फळे व भाज्या : सफरचंद, फणस, अक्रोड, कलिंगड, फ्लॉवर, ढबू मिरची, हिरवी मिरची, फळांची टोपली, मटार भुईमूग, केक, द्राक्षे, चॉकलेट, आलं, भेंडी, पाव.
दागिने, कपडे : कानातले, नेकलेस, बांगड्या, अंगठी. कोट, बूट, कोल्हापुरी चप्पल, बेल्ट
अन्य साहित्य : दाढी करण्याचे रेझर, पंचिंग मशीन, स्वीच बोर्ड, खिडकी, कपडे अडकविण्यासाठी भिंतीची पट्टी, स्कूल बॅग, उशी, किचनमधील सिंक, करवत, हातगाडी, विटा, खाट.
घरातील साहित्य : कचरापेटी, जेवणाचा डबा, सेफ्टी पिन, नेल कटर, टूथपेस्ट, ब्रश, कात्री, पेट्रोलपंप, पाणी गरम करायचे रॉड, लायटर, कडी पेन स्टॅन्ड टाय, नुडल्सचे वाडगे, दरवाजाची कडी, फ्रीज, टीव्ही, लॅपटॉप, वाॅशिंग मशीन, जातं, पोळपाट बेलन, टोस्टर.