निवडणूक भीमा कारखान्याची अन् चर्चा मात्र कोल्हापूरच्या राजकारणाची...!!! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2022 09:36 AM2022-11-11T09:36:53+5:302022-11-11T09:37:32+5:30

पंढरपूर, मोहोळ आणि मंगळवेढा तालुक्यातील ६३ गावांमधील १९ हजार तीनशे सभासद असलेला हा कारखाना येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अर्थवाहिनी बनला आहे.

The election is about Bhima factory and the discussion is about the politics of Kolhapur...!!! | निवडणूक भीमा कारखान्याची अन् चर्चा मात्र कोल्हापूरच्या राजकारणाची...!!! 

निवडणूक भीमा कारखान्याची अन् चर्चा मात्र कोल्हापूरच्या राजकारणाची...!!! 

googlenewsNext

- पोपट पवार 

 कोल्हापूर : पंढरपूर, मोहोळ आणि मंगळवेढा तालुक्याचे कार्यक्षेत्र असणाऱ्या आणि भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्या अधिपत्याखाली असलेल्या टाकळी सिंकदर (ता. मोहोळ) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भलतीच रंगत भरली असून आरोप-प्रत्यारोपांनी  भीमा खोरे ढवळून निघाले आहे. मात्र, या निवडणुकीच्या प्रचारार्थ गावागावांमध्ये दोन्ही पॅनेलच्या नेत्यांकडून कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणाचे, नेत्यांचे संदर्भ दिले जात असल्याने ही निवडणूक कोल्हापूर जिल्ह्याभोवतीच केंद्रीत झाली की काय असा प्रश्न भीमा कारखान्याच्या सभासदांना पडला आहे.  

पंढरपूर, मोहोळ आणि मंगळवेढा तालुक्यातील ६३ गावांमधील १९ हजार तीनशे सभासद असलेला हा कारखाना येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अर्थवाहिनी बनला आहे. सलग २५ वर्षे माजी आमदार स्व. सुधाकरपंत परिचारक आणि माजी आमदार राजन पाटील यांनी या कारखान्याचे नेतृत्व केले. मात्र, त्यानंतर गेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये माजी आमदार स्व.भारत भालके यांना सोबत घेत खासदार धनंजय महाडिक यांनी हा कारखाना ताब्यात ठेवण्यात यश मिळवले होते.

यंदाही या कारखान्याच्या निवडणुकीत उमेश परिचारक आणि राजन पाटील गटाने महाडिक गटासमोर आव्हान उभे केले आहे. कामगारांचे पगार थकले आहेत, पीएफचे  पैसे भरलेले नाहीत, कारखान्यावर ६०० कोटींचे कर्ज आहे असा आरोप विरोधकांकडून होत आहे. तर हे सर्व आरोप  फेटाळत धनंजय महाडिक हे विराधकांच्या खासगी कारखान्याच्या   कारभारावर प्रश्नचिन्ह उभे करत आहेत. को-जनरेशन प्रकल्प, इथेनॉल, सभासदांना योग्य दर दिल्याचा दावा महाडिक गटाकडून केला जात आहे.

 मुश्रीफांचा सांगावा... 

भीमा कारखान्याच्या निवडणुकीत भीमा बचाव परिवर्तन पॅनेलचे प्रमुख राजन पाटील हे प्रत्येक सभेत धनंजय महाडिक आणि कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारण याचे संदर्भ देत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात महाडिकांचे काहीच राहिले नाही, सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांनी महाडिकांचा  सगळा गाशा गुंडाळला आहे.   शिर्डीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनात माजी मंत्री हसन मुश्रीफ हे भेटल्यानंतर त्यांनी मला  ‘आम्ही नाक तोंड बांधलय, थोडं शेपूट वळवळतय’ ती बंद करण्याची तुमची जबाबदारी असल्याचा सांगावा दिल्याचा दावा राजन पाटील अनेक सभांमधून करत आहेत.  

कारखान्याच्या अडचणीस सतेज पाटीलही कारणीभूत

भीमा कारखाना कसा अडचणीत येईल या दृष्टीने विरोधक गेली पाच वर्ष प्रयत्न करत होते. साखर कारखान्याला कर्ज,  साखर विक्रीला परवानगी मिळू नये यासाठी विरोधकांनी केलेल्या प्रयत्नाला तत्कालीन मंत्री सतेज पाटील यांनीही साथ दिल्याचा आरोप धनंजय महाडिकांकडून वारंवार होत आहे. त्यांच्या या कारनाम्यामुळेच कारखाना अडचणीत आल्याचे ते सभासदांच्या निदर्शनास आणून देत आहेत.  

 वजनकाटा चोख, चूक निघाल्यास एक लाख देणार 

भीमा कारखान्याचा वजन काटा चोख आहे, एक किलोचा जरी फरक निघाला तर एक लाख रूपये संबंधितांना देऊ अशी घोषणाच महाडिक यांनी केली आहे. विरोधकांनी त्यांच्या कारखान्यातील वजन काटा पारदर्शक असल्याची स्पष्टता द्यावी असे आव्हानही महाडिक यांनी दिले आहे.  

 ते शेतकऱ्यांचे हित काय जोपासणार 

माजी आमदार राजन पाटील यांनी सहकारी असलेला अनगर येथील लोकनेते बाबुरावअण्णा पाटील साखर कारखाना खासगी केला आहे. याच मुद्द्यावर महाडिक गटाने प्रचार केंद्रित केला आहे.  शेतकऱ्यांच्या मालकीचा कारखाना खासगी करणारे शेतकऱ्यांचे हित काय जोपासणार असा सवाल महाडिक गटाकडून केला जात आहे. हा मुद्दा परिचारक-पाटील गटाला जाचक ठरत आहे.

प्रशांत परिचारक अलिप्तच

भीमा कारखान्याच्या निवडणुकीत परिचारक गट तितकासा ताकदीने उतरला नसल्याचे चित्र आहे. माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे बंधू उमेश परिचारक, पुतणे प्रणव परिचारक हे शेवटच्या टप्प्यातील प्रचारात सहभागी झाले असले तरी परिचारक गटाची धुरा सांभाळणारे प्रशांत परिचारक मात्र, या निवडणुकीच्या आखाड्यापासून अद्यापही दूरच आहेत.  उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या फोनमुळेच प्रशांत परिचारक निवडणुकीपासून अलिप्त असल्याची चर्चा आहे. तसे आरोपही दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते जाहीर व्यासपीठावरून करत आहेत.

Web Title: The election is about Bhima factory and the discussion is about the politics of Kolhapur...!!!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.