कोल्हापुरात अकरावीचा कलऑफ दोन टक्क्यांनी वाढला

By संदीप आडनाईक | Published: June 22, 2024 01:34 PM2024-06-22T13:34:25+5:302024-06-22T13:34:57+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी राबविलेल्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेनुसार यंदा विज्ञान आणि वाणिज्य शाखेसाठी सर्वच महाविद्याालयांत ...

the eleventh calloff increased by two percent In Kolhapur | कोल्हापुरात अकरावीचा कलऑफ दोन टक्क्यांनी वाढला

कोल्हापुरात अकरावीचा कलऑफ दोन टक्क्यांनी वाढला

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी राबविलेल्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेनुसार यंदा विज्ञान आणि वाणिज्य शाखेसाठी सर्वच महाविद्याालयांत अकरावीचा कटऑफ सरासरी दोन टक्क्यांनी वाढला आहे, अशी माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयातील सहायक शिक्षण संचालक स्मिता गौड यांनी शुक्रवारी दिली. गतवर्षीच्या तुलनेत शहरातील विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील प्रवेशाचा कटऑफ सरासरी २ टक्के वाढला आहे.

विवेकानंद महाविद्यालयातील विज्ञान शाखेचा यंदाचा कटऑफ ९२ टक्के इतका असून, गतवर्षीच्या तुलनेत तो २ टक्क्यांनी वाढला आहे. गतवर्षी तो ९० टक्के होता. त्यापाठोपाठ न्यू कॉलेजचा कटऑफ ९१ टक्के इतका असून, गतवर्षी तो ८९ टक्के होता. राजाराम कॉलेजचा टक्का ९०.४० टक्के झाला असून, गतवर्षी तो ८८.४० टक्के होता. दरम्यान, वाणिज्य शाखेसाठी यंदा देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स महाविद्यालयात ९१ टक्के कटऑफ असून, गतवर्षी तो ८९.८० टक्के होता. त्यापाठोपाठ विवेकानंद कॉलेजचा कटऑफ ८६ टक्के इतका असून, तो गतवर्षी ८३ टक्के होता. डीडी शिंदे सरकार महाविद्यालयाचा कटऑफ ८३.४० टक्के इतका झाला असून गतवर्षी तो ८२.२० टक्के इतका होता.

या पत्रकार परिषदेला शिक्षण निरीक्षक हेमंत बिराजदार, प्रवेश परीक्षा समितीचे कार्याध्यक्ष प्रा. जे. आर. जोशी, प्रा. एम. एन. जाधव, प्रा. व्ही. बी. डोणे, प्रा. ए. एम. कोतवाल, देवेंद्र भोसले आदी उपस्थित होते.

विज्ञान शाखेकडे कल वाढला 

दहावीच्या परीक्षेत मिळालेले भरघोस गुण, जादा संख्येने ऑनलाईन पद्धतीने भरलेले अर्ज आणि विज्ञान शाखेकडे वाढलेला विद्यार्थ्यांचा कल यामुळे गतवर्षीच्या तुलनेत अकरावीसाठी प्रवेशांची संख्या वाढल्याने यंदाचा कट ऑफ वाढल्याचे सहाय्यक शिक्षण संचालक स्मिता गौड यांनी सांगितले.

यंदा सीबीएसई आणि आयसीएसईच्या तुलनेत राज्य मंडळांच्या विद्यार्थ्यांनी गुणवत्तेच्या बाबतीत चांगलाच लढा दिलेला दिसून येतो. वाणिज्य आणि कला शाखेला जाण्याऐवजी विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेला अधिक पसंती दिल्याचे दिसून येते. त्यामुळे या शाखेत उत्तीर्ण विद्यार्थी व उपलब्ध जागांचे व्यस्त प्रमाण दिसत आहे.

भविष्यातील विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेकडे प्रवेश घेण्यासाठी विज्ञान शाखेचा मार्ग विद्यार्थ्यांनी चोखाळलेला आढळून येतो. क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे अर्ज आल्याने या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयात क्षमता वाढवून देण्याचा पर्याय समितीकडे आहे. नोकरीची संधी आणि तेथील स्पर्धा लक्षात घेउन यावेळी विद्यार्थ्यांनी उत्तम गुण मिळवलेले आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखा निवडण्यासाठी पालकांचा असलेला आग्रहही यामागे आहे. यंदाचा निकाल लक्षात घेतला तर ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय आहे.

Web Title: the eleventh calloff increased by two percent In Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.