बिबट्याचा हल्ल्यातील मृत मुलीच्या कुटुंबीयांना २० लाख रुपये मिळणार, कोल्हापुरातील शाहूवाडी येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 02:25 PM2022-12-23T14:25:43+5:302022-12-23T17:45:47+5:30
केदारलिंगवाडी येथे वास्तव्यास असणाऱ्या त्या संबंधित चार कुटुंबीयांना स्थलांतरित होण्याबाबतच्या नोटीस
शित्तुर वारुण : शाहूवाडी तालुक्यातील केदारलिंगवाडी येथे बुधवारी (दि.२१) बिबट्याचा हल्ल्यात मृत झालेल्या मुलीचा कुटुंबीयांना वन विभागाने २० लाख रुपये मदत मंजूर केली आहे.
काल गुरुवारी दिवसभर त्याबाबत कागदपत्रांची पूर्तता करण्याची प्रक्रिया सुरू होती. नावातील तांत्रिक कारणामुळे आज निधी देता आला नाही. आज, शुक्रवारी सकाळी मुलीच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपयेचा धनादेश व दहा लाख रुपये मुदतबंद ठेव स्वरूपात दिली जाणार आहेत.
नरभक्षक बिबट्याला दोन दिवसांत सापळा लावून पकडण्यासाठी यंत्रणा तयार केली असल्याची माहिती मलकापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमित भोसले यांनी दिली. उदगिरी परिसरात वनविभागाचे गस्त पथक कार्यरत असून, जिथे हल्ला झाला त्या परिसरात ट्रप कॅमेरा लावला असून वन्यजीव बचाव पथक आजपासून येथे कार्यरत ठेवले आहे. बिबट्याचा माग घेणारी मोहीम युद्धपातळीवर राबवित असल्याचेही भोसले यांनी सांगितले.
केदारलिंगवाडी येथे वास्तव्यास असणाऱ्या त्या संबंधित चार कुटुंबीयांना स्थलांतरित होण्याबाबतच्या नोटीस वनविभागाने दिल्या असून सदर कुटुंबीयांनी स्थलांतरित होण्याचे मान्य केले आहे.