Kolhapur: शेतकरी संघातील वाढत्या खाबूगिरीने गोदामे मोकळी, किती कोटीचा तोटा.. जाणून घ्या
By राजाराम लोंढे | Updated: January 6, 2025 14:28 IST2025-01-06T14:24:50+5:302025-01-06T14:28:12+5:30
गेल्या दहा वर्षात विविध शाखांत तीन कोटींपेक्षा अधिक गोलमाल

Kolhapur: शेतकरी संघातील वाढत्या खाबूगिरीने गोदामे मोकळी, किती कोटीचा तोटा.. जाणून घ्या
राजाराम लोंढे
कोल्हापूर : शेतकरी संघाच्या अधोगतीला तत्कालीन संचालकांसह काही कर्मचाऱ्यांची खाबुगिरी कारणीभूत ठरली आहे. गेल्या दहा वर्षांत संघात तब्बल तीन कोटींपेक्षा अधिकचा गोलमाल झाल्याने बसलेला संघाचा बैल उठलाच नाही. कार्वे (ता. चंदगड) सारख्या एका शाखेत तब्बल ८० लाखांचा अपहार झाला, यावरून अपहाराने संघाची गोदामे किती पोखरली आहेत, हे लक्षात येते. राजकीय अभय असल्याने कारवाईचा धाक नसल्यानेच असे धाडस होते. सध्या ३.८१ कोटींचा संचित तोटा संघाच्या मानगुटीवर आहे.
गेल्या वीस वर्षांतील सगळेच संचालक कारभाराला दोषी आहेत, असे म्हणता येणार नाही. काहींनी प्रामाणिक प्रयत्न केला, पण संघाचा बैल इतक्या दलदलीत अडकला त्याला बाहेर काढणे त्यांच्याही आवाक्याबाहेर गेले. शासकीय प्रशासकीय मंडळाचे कामकाज समजावून घेऊन त्यांना शिस्त लावण्यातच वर्षाचा कालावधी गेला. त्यानंतर अशासकीय प्रशासक मंडळ आले, त्यांनीही खूप प्रयत्न केले तोपर्यंत नेत्यांना निवडणुकीची घाई झाली. अगोदरच कोट्यवधींच्या तोट्यात असलेल्या संघाच्या डोक्यावर २७ लाखांचा निवडणूक खर्च पडला.
पगार कमी आणि गरजा तेवढ्याच राहिल्याने काही कर्मचाऱ्यांकडून अधिकाराचा गैरवापर केल्याने अपहार झाला. त्याशिवाय कोट्यवधी रुपयांची उधारी प्रलंबित आहे. संघातील सर्वच कर्मचारी या वृत्तीचे नाहीत, संघ टिकला तरच आपला संसार वाचेल, या भावनेने काम करणारे अनेक कर्मचारी आहेत. मात्र, राजकीय अभय असलेल्या काही कर्मचाऱ्यांमुळे संघातील अपहाराची मालिका खंडित होण्याचे नाव घेत नाही.
संघाच्या ६३ पैकी ३० शाखा तोट्यात
शेतकरी संघाच्या जिल्ह्यात ६३ शाखा कार्यरत आहेत. पण, पुरेसा माल व योग्य मार्केटिंग नसल्याने त्यातील तब्बल ३० शाखा तोट्यात आहेत. उर्वरित ३३ पैकी बहुतांशी शाखा तांत्रिक पातळीवरच नफ्यात दिसत आहेत. मग, संघ नफ्यात कसा येईल.
क्षमतेपेक्षा खताचे निम्मेच उत्पादन
संघाचा रुकडी (ता. हातकणंगले) येथील खत कारखाना पूर्णक्षमतेने चालवण्याची गरज आहे. साधारणता सात हजार टनापेक्षा अधिक उत्पादन घेऊन त्याची विक्री चांगल्या प्रकारे केली तर त्यातून किमान एक कोटीचा नफा मिळू शकतो. पण, गेल्या हंगामात कसेबसे ‘दाणेदार’चे १७०० टन, तर हातमिश्रित खत २५०० टनाचे उत्पादन घेतले. मग, संघ नफ्यात कसा येणार?
कारभाऱ्यांचा हस्तक्षेपच कारणीभूत
संघात विशिष्ट संचालकांच्या मर्जीतील व्यक्तीविशेष अधिकारी कार्यरत आहेत. त्यांनाच सोबत घेऊन कारभाऱ्यांचा हस्तक्षेप गरजेपेक्षा वाढला आहे, तोही कारणीभूत आहे.
पूर्वी हमालही काढत होते ताळेबंद
पूर्वी शेतकरी संघातील नोकरीला प्रतिष्ठा होती. त्यामुळे शाखांच्या पातळीवर हमालापासून व्यवस्थापकांपर्यंत सगळेच तळमळीने काम करायचे. व्यवस्थापक उशिरापर्यंत शाखांमध्ये काम करून रोजचा रोज ताळमेळ घेत होते. आपल्या शाखेतील हमालाला सुद्धा ताळेबंद समजला पाहिजे या भावनेतून शिकवला जायचा. मात्र, आज संघात बोटावर मोजण्या इतपतच कर्मचाऱ्यांना ताळेबंद काढता येतो.