ZP Election: कोल्हापुरात आघाडीचा नारळ फुटला, आजऱ्यात भाजप-राष्ट्रवादी एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 01:19 PM2022-06-07T13:19:22+5:302022-06-07T13:34:43+5:30

राज्यात जरी राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसचे संयुक्त महाविकास आघाडी सरकार असले तरी, स्थानिक पातळीवर अनेक ठिकाणी हे तीनही पक्ष एकमेकांच्या विरोधात आतापर्यंत शड्डू ठोकून उभे आहेत.

The first front for Zilla Parishad elections is in Ajara, BJP Ashok Charati and NCP Jayawantrao Shimpi together | ZP Election: कोल्हापुरात आघाडीचा नारळ फुटला, आजऱ्यात भाजप-राष्ट्रवादी एकत्र

ZP Election: कोल्हापुरात आघाडीचा नारळ फुटला, आजऱ्यात भाजप-राष्ट्रवादी एकत्र

Next

कोल्हापूर : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये पक्षीय बंधनांपेक्षा स्वतंत्र आघाड्यांना महत्त्व येणार असून आजरा तालुक्याने अशा आघाडीचा पहिला नारळ रविवारी सत्कार कार्यक्रमाच्या निमित्ताने फोडला. विशेष म्हणजे भाजपचे वरिष्ठ नेते अशोक चराटी आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयवंतराव शिंपी हे एकत्र आले असून तालुक्यातील सर्व निवडणुका या आघाडीतर्फे लढवण्याची घोषणा त्यांनी केली आहे. याची पुनरावृत्ती काही तालुक्यांमध्ये होणार असल्याचे दिसून येते.

राज्यात जरी राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसचे संयुक्त महाविकास आघाडी सरकार असले तरी, स्थानिक पातळीवर अनेक ठिकाणी हे तीनही पक्ष एकमेकांच्या विरोधात आतापर्यंत शड्डू ठोकून उभे आहेत. करवीरमध्ये काँग्रेसचे आमदार पी. एन पाटील आणि शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्यात उभा दावा आहे.

आजरा, राधानगरी आणि भुदरगडमध्ये राष्ट्रवादीचे के. पी. पाटील आणि शिवसेनेचे प्रकाश आबिटकर हे पारंपरिक विरोधक आहेत. शिरोळ तालुक्यात मूळचे राष्ट्रवादीचे असलेले राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना जिल्हा बँकेत सर्वपक्षीयांनी विरोध केला हाेता. चंदगड तालुक्यात सतेज पाटील यांना मानणारे काही कार्यकर्ते आमदार राजेश पाटील यांच्याविरोधात आहेत. हातकणंगलेमध्ये आमदार राजूबाबा आवळे आणि शिवसेनेचे माजी आमदार सुजित मिणचेकर परस्परांचे विरोधक आहेत. अनेक तालुक्यांत अशा पध्दतीने दोन्ही काँग्रेस आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधात आतापर्यंत सक्रिय होते.

अनेकदा पक्षीय बंधनात राहून नेते सांगतील तसे करण्यापेक्षा आघाडी करून वेळ पडल्यास राजकीय पदांसह सर्व प्रकारचे लाभ करून घेता येतात. तालुक्यातील राजकीय स्थितीच अशी असते की, एकत्र येऊन लढण्याशिवाय गत्यंतर नसते. पक्षीय चिन्हापेक्षा अपक्ष किंवा आघाडी म्हणून लढल्याने कार्यकर्त्यांना सामावून घेता येते. त्यामुळे अनेक तालुक्यांमध्ये आघाडी करण्याला प्राधान्य दिले जाते.

राज्यात भाजप शिवसेनेचे सरकार आल्यानंतर अशोक चराटी यांनी २०१४ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. शिंपी हे गेली अनेक वर्षे राष्ट्रवादीचे नेते आहेत. गेल्याचवर्षी त्यांना राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून संधी देण्यात आली. परंतु स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांशी त्यांचे पटत नसल्याने अखेर जिल्हा बॅंकेप्रमाणेच यापुढच्या निवडणुका एकत्र लढविण्याचा निर्णय या दोघांनी घेतला. टीम सतेज म्हणून कार्यरत असणारे नगरसेवक अभिषेक शिंपी हे देखील या दोघांसोबत आहेत.

विसर्जित जिल्हा परिषदेतील आघाड्या...

कुपेकर यांची चंदगड तालुक्यातील युवा क्रांती आघाडी, प्रकाश आवाडे यांची ताराराणी आघाडी, महाडिक यांची ताराराणी आघाडी, प्रकाश आबिटकर यांची शाहू आघाडी या आघाड्यांच्या माध्यमातून नेत्यांनी गेल्यावेळच्या निवडणुका लढवल्या होत्या. यातील आवाडे, आबिटकर, स्वाभिमानी यांना पदांची पाठिंब्याच्या बदल्यात पदाची लॉटरी लागली.

आबिटकर काय करणार?

चराटी आणि आबिटकर हे अनुक्रमे भाजप, शिवसेनेत असले तरी, त्यांचे संबंध चांगले आहेत. के. पी. पाटील यांच्या पाठीशी राहणाऱ्या राष्ट्रवादीसोबत जाण्यापेक्षा आबिटकर हे चराटी, शिंपी यांच्याशी जुळवून घेतात, की शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या चिन्हावर उमेदवार उभे करतात, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. कदाचित ते भुदरगड आणि राधानगरीमध्ये शिवसेनेच्या चिन्हावर आणि आजऱ्यात आघाडीच्या माध्यमातून सक्रिय राहतील असे दिसते.

Web Title: The first front for Zilla Parishad elections is in Ajara, BJP Ashok Charati and NCP Jayawantrao Shimpi together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.