कोल्हापूर जिल्ह्यातील पहिला गोबरधन प्रकल्प 'या' गावात होणार कार्यान्वित, वीज बिलात होईल बचत
By समीर देशपांडे | Published: July 23, 2024 05:37 PM2024-07-23T17:37:31+5:302024-07-23T17:37:56+5:30
समीर देशपांडे कोल्हापूर : यापुढच्या काळात पाणी योजनेपासून ते पथदिव्यांसाठीच्या विजेचा खर्च वाढतच जाणार असल्याने यावर पर्याय म्हणून अपारंपरिक ...
समीर देशपांडे
कोल्हापूर: यापुढच्या काळात पाणी योजनेपासून ते पथदिव्यांसाठीच्या विजेचा खर्च वाढतच जाणार असल्याने यावर पर्याय म्हणून अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर महत्त्वाचा ठरणार आहे. हेच महत्त्व ओळखून माणगाव (ता. हातकणंगले) येथे ५० लाख रुपये खर्चून ‘गोबरधन’ प्रकल्प उभारण्यात आला असून, लवकरच तो कार्यान्वित करण्यात येणार आहे. यासाठी संपूर्ण निधी केंद्र शासनाने दिला आहे.
बायाेगॅस प्रकल्प उभारण्यात कोल्हापूर जिल्हा गेली २० वर्षे देशात अव्वल आहे. याच पार्श्वभूमीवर मोठ्या गावातील ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातून निर्माण होणाऱ्या बायोगॅसवर विद्युत उपकरणे चालविण्याचा विचार केंद्र शासनाकडून सुरू होता. यातूनच मग गोबरधन प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. विविध योजना प्रभावीपणे राबविणाऱ्या माणगावची या केंद्र शासनाच्या प्रकल्पासाठी जिल्ह्यातून निवड करण्यात आली. ग्रामपंचायतीने गावाबाहेरील जागा यासाठी उपलब्ध करून दिली.
गॅससाठीची टाकी, स्लरीचा हौद यासह आवश्यक यंत्रणा या ठिकाणी उभारण्यात आली असून, सध्या यामध्ये ओला कचरा टाकण्याचे काम सुरू आहे. कचरा जर कमी पडला तर शेजारच्या ज्या गावात आठवडा बाजार असतो तेथील भाज्यांचा कचरा गोळा करून या प्रकल्पावर आणण्यात येणार आहे. या ठिकाणी रोज १५०० किलो कचरा टाकण्यात येणार असून, त्यातून रोज १०० ते १२० युनिट वीज निर्मिती होणार आहे. यातून माणगावातील १०० हून अधिक असणारे पथदिवे सुरू ठेवण्याचे नियोजन ग्रामपंचायतीने केले आहे.
बायोगॅस प्रकल्पापासून आवश्यक तितके खांब टाकण्यात आले असून, येथून निर्माण झालेली ऊर्जा वहन करण्यासाठी तीन ठिकाणी कन्व्हरटर बसविण्यात येणार आहेत. लवकरच हा प्रकल्प पूर्ण कार्यक्षमतेने सुरू होणार असून, त्याचा फायदा ग्रामपंचायतीला होऊन वीज बिलात बचत होणार आहे. - माधुरी परीट प्रकल्प संचालक, जलजीवन मिशन, जिल्हा परिषद, कोल्हापूर.
ग्रामपंचायतीने युद्धपातळीवर हा प्रकल्प पूर्ण केला आहे. सध्या या ठिकाणी ओला कचरा टाकण्याचे काम सुरू असून, गॅस निर्मिती सुरू आहे. येत्या पंधरवडयात पूर्ण क्षमतेने गॅस निर्मिती होणार असून, याचवेळी या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात येणार असून, यातून वीज बचतीचा फायदा होणार आहे. - राजू मगदूम, सरपंच, माणगाव