हंगामातील पहिला हापूस कोल्हापूर बाजार समितीत दाखल, दक्षिण आफ्रिकेतील ‘मालावी’ हापूसची आवक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 05:42 PM2022-11-29T17:42:59+5:302022-11-29T17:43:34+5:30
दापोली कृषी विद्यापीठातून आंब्याची कलमे तिकडे नेऊन केली होती रोपण
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये रविवारी दक्षिण आफ्रिकेतील ‘मालावी’ हापूसची आवक दस्तगीरभाई मकबूलभाई बागवान यांच्या अडत दुकानात झाल्याची माहिती बाजार समितीच्यावतीने देण्यात आली.
कोकणचा राजा असलेल्या हापूस आंब्याप्रमाणे दक्षिण आफ्रिकेतील मालावी जातीचा हापूस कोल्हापुरात दाखल झाला आहे. गेल्या वर्षीदेखील या मालावी हापूस आंब्याची आवक झाली होती. यंदा लवकरच हा आंबा बाजारात आल्याने ग्राहकांना हापूस आंब्याची चव जरा अगोदर चाखायला मिळणार आहे.
दस्तगीरभाई मकबूलभाई बागवान यांच्या अडत दुकानात ‘मालावी’ बारा आंब्याचे ५ बॉक्स, तर चौदा आंब्याचे १० बॉक्सची आवक झाली आहे. त्याचबरोबर केरळ येथून एक डझनचे दहा व दोन डझनचे दहा बॉक्स दाखल झाले आहेत.
दक्षिण आफ्रिका खंडातील मालावी देशात ‘मालावी मॅंगोज’ नावाची कंपनी स्थापन करण्यात आली आहे. दापोली कृषी विद्यापीठातून आंब्याची कलमे तिकडे नेऊन त्याचे रोपण करण्यात आल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.