दोन वर्षानंतर जोतिबा डोंगरावर घुमला चांगभलंचा गजर, जोतिबाचा पहिला खेटा उत्साहात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 03:31 PM2022-02-21T15:31:51+5:302022-02-21T15:32:37+5:30
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे गेले दोन वर्षे बंद असणारे खेटे यात्रा यंदा प्रथमच झाल्याने भाविकांनी मोठी गर्दी केली.
जोतिबा : दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाचा पहिला रविवार खेटा उत्साहात पार पडला. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे गेले दोन वर्षे बंद असणारे खेटे यात्रा यंदा प्रथमच झाल्याने भाविकांनी मोठी गर्दी केली.
माघ पौर्णिमापासून सलग पाच रविवार खेटे यात्रा असते. यंदा २० फेब्रुवारी ते २० मार्च दरम्यान खेटे होणार आहेत. कोल्हापूर ते जोतिबा चालत जाऊन रविवार खेटे करण्याची परंपरा आहे. पहिल्या खेटेला येणाऱ्या भाविकांच्या गर्दीमुळे पहाटेपासून मंदिरात पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
कोल्हापूर वडणगे निगवे, कुशिरे गायमुखमार्गे जोतिबा या पारंपारिक मार्गाने चालत भाविकांनी पहिला खेटा पुर्ण केला. पहाटेपासूनच डोंगरावर चांगभलंचा गजर घुमू लागला. पहाटे ४ ते रात्री ११ पर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले होते. रांगेसाठी स्वतंत्र मंडप उभा केला होता. उत्तर दरवाजातून मंदिरात प्रवेश दिला जात होता. दक्षिण दरवाज्यातून भाविक बाहेर पडत होते.
चारपैकी दोनच दरवाजे उघडले होते. गर्दीमुळे ई-पास व्यवस्था बंद करण्यात आली. १० वर्षांच्या खालील लहान मुलांना मंदिर प्रवेश दिल्या नसल्याने भाविक संताप व्यक्त करीत होते. पन्हाळा तहसीलदार रमेश शेंडगे यांनी दर्शनरांग व्यवस्था पाहणी केली. कोडोली पोलीस सपोनि शीतल कुमार डोईजड यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त तैनात होता.
अभिषेकानंतर प्रवीण कापरे, शिवाजी बनकर, दत्तात्रय धडेल, अशोक धडेल, यांनी पूजा बांधली. उंट, घोडे, पुजारी, देवसेवक, वाजंत्रीच्या लवाजम्यासह धूपारती पालखीचा सोहळा झाला. सकाळी ९ वा. अभिषेक झाला. चांगभलं गजर, गुलाल-खोबऱ्यांची उधळण झाली. बाजारपेठ गर्दीने फुलली होती. एस.टी.बंदमुळे खासगी वाहतूक सुरु होती.