राज्याची पहिलीच शाश्वत विकास परिषद २५ जून रोजी कोल्हापुरात
By भारत चव्हाण | Published: June 16, 2024 02:14 PM2024-06-16T14:14:20+5:302024-06-16T14:14:39+5:30
मित्रा संस्थेच्या माध्यमातून संकल्पित करण्यात आलेल्या प्रयोजनांपैकी शाश्वत विकास परिषद एक असून या परिषदेच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
कोल्हापूर : राज्यातील उद्योजक, बिल्डर्स, वकील, डॉक्टर, शिक्षक, प्राध्यापक, शास्त्रज्ञ, शेतकरी यासह विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व अभ्यासक या सर्वांसोबतची राज्यातील पहिलीच शाश्वत विकास परिषद दि.२५ जून रोजी कोल्हापुरात होत असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तसेच मित्रा संस्थेचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली. परिषदेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, उद्योग विभागाचे प्रधान सचिव, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रभाग सचिव, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
मित्रा संस्थेच्या माध्यमातून संकल्पित करण्यात आलेल्या प्रयोजनांपैकी शाश्वत विकास परिषद एक असून या परिषदेच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यावेळी क्षीरसागर यांनी ही माहिती दिली. यावेळी बोलताना क्षीरसागर यांनी सांगितले की, देशाचा व पर्यायाने राज्याचा सर्वांगीण विकास करत असताना तो शाश्वत स्वरूपाचा असणे व विकासामध्ये प्रत्येक घटकाचे योगदान असणे आवश्यक आहे. यातूनच शाश्वत विकास परिषद या संकल्पनेचा उगम झाला आहे. या परिषदेच्या माध्यमातून उद्योग, पर्यटन, माहिती तंत्रज्ञान, कृषी, व्यापार या प्रमुख क्षेत्रांवर भर देवून राज्याच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
प्रत्येक जिल्ह्याला विकासाचे उद्धिष्ठ ठरवून देत राज्याच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फौंड्री व्यवसाय आहेत. यासह राज्यातील इतर मुख्य औद्योगिक क्षेत्रांसाठी सहाय्य करणारे उद्योगही आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील गुंतवणूक वाढीसाठी या परिषदेचा फायदा होणार आहे, असे क्षीरसागर यांनी सांगितले. बैठकीस मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एम., इचलकरंजी महापालिका प्रशासक ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. विजय पवार यासह सर्व प्रमुख विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.