‘जय श्रीराम’च्या जयघोषात राज्यातील पहिली रेल्वे कोल्हापुरातून अयोध्येकडे रवाना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेला प्रारंभ
By संदीप आडनाईक | Published: September 28, 2024 06:33 PM2024-09-28T18:33:35+5:302024-09-28T18:35:45+5:30
श्रीराम, भरत, सीता आणि हनुमानाच्या वेशभूषेतील कलाकारांनी सर्वांचे स्वागत केले
कोल्हापूर : ‘जय श्रीराम, जय जय श्रीराम’च्या जयघोषात शनिवारी कोल्हापुरातून ८०० प्रवासी तीर्थदर्शनासाठी विशेष रेल्वेने अयोध्येकडे रवाना झाले. भगव्या पताका, फेटे, टोप्या, उपरणे परिधान केलेल्या प्रवाशांवर गुलाबपुष्पांची उधळण करण्यात आली. रेल्वे फुलांच्या माळा आणि फुगे बांधून सजविण्यात आली होती. कावड हातात घेतलेले मुख्यमंत्र्यांचा मुखवटा असलेले श्रावणबाळाच्या तसेच श्रीराम, भरत, सीता आणि हनुमानाच्या वेशभूषेतील कलाकारांनी सर्वांचे स्वागत केले.
सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रारंभ केला. वैद्यकीय शिक्षण व विशेष साहाय्य मंत्री आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. मुख्यमंत्री शिंदे यांनी व्हिडिओद्वारे शुभेच्छा संदेश देताना अंबाबाईला वंदन करून राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन केले. ते म्हणाले, या योजनेचा प्रारंभ दक्षिण काशी, अंबाबाईच्या करवीरमधून होतो आहे याचा मनापासून आनंद होत आहे.
मुश्रीफ म्हणाले, या योजनेतील पहिली रेल्वे कोल्हापुरातून जातेय हे माझे भाग्यच आहे. खासदार धैर्यशील माने यांनी या योजनेची सुरुवात कोल्हापुरातून केल्याबद्दल मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले.
कोल्हापूर जिल्ह्याने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या शुभारंभाचा मान पटकावला आहे. या योजनेचा आता राज्यभरातील सर्वच जिल्ह्यांतील लोकांना लाभ मिळेल. त्याबद्दल जिल्हा समिती, पालकमंत्री यांचे विशेष अभिनंदन. -विलास निवृत्ती कांबळे, बेलवळे बुद्रुक, ता. कागल
श्रावणबाळाप्रमाणे सरकारने ज्येष्ठ व्यक्तींना तीर्थाटनाची सोय करून दिली ही आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे. - मालन दिनकर डवर, चंदगड
तीर्थयात्रेत सहभागी ज्येष्ठांसाठी रेल्वेत औषध, वैद्यकीय सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत. जेष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेतली जाईल, अशी अपेक्षा आहे. -प्रकाश रामचंद्र कांबळे, गोरंबे