स्वातंत्र्यलढ्याचा पहिला हुंकार कोल्हापुरातील शिवाजी पेठेतून, बावडेकर आखाडा होता केंद्रस्थानी
By संदीप आडनाईक | Published: August 16, 2024 11:50 AM2024-08-16T11:50:56+5:302024-08-16T11:51:16+5:30
भूमिगत सैनिकांना मिळे आसरा
संदीप आडनाईक
कोल्हापूर : स्वातंत्र्य मिळून आज भारताला ७८ वर्षे पूर्ण झाली; परंतु त्यासाठी लढणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या आणि ठिकाणांच्या आठवणी आजही ताज्या आहेत. कोल्हापुरातही १९२४ पासूनच स्वातंत्र्यलढ्याची ठिणगी पडली होती. या स्वातंत्र्यलढ्याचा पहिला हुंकार शिवाजी पेठेतून निघाला. येथील पंत अमात्य बावडेकर आखाडा या चळवळीच्या केंद्रस्थानी होता. अनेक भूमिगत स्वातंत्र्यसैनिकांचे ते आश्रयस्थान ठरले.
महात्मा गांधी यांची चळवळ १९२४ मध्ये सुरू झाली. याचे पहिले सत्याग्रही गोपाळ मेथे होते. कोल्हापुरात चरखा संघ आणि खादी उत्पादन संघ स्थापन करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. स्वदेशी चळवळ, परदेशी कापडाची होळी, झेंडा सत्याग्रह अशी चळवळ सुरू झाली. त्यात कटकोळे, कट्टी आणि इतर कार्यकर्ते सहभागी होते. १९२७ मध्ये महात्मा गांधी कोल्हापुरात आले. त्यांनी तपोवन येथे चरखा संघाच्या इमारतीची पायाभरणी केली.
यावेळी सत्यशोधक चळवळीतील वासुदेवराव तोफखाने, गोपाळ मेथे, खंडेराव बागल, कटकोळ आदी कार्यकर्ते राष्ट्रीय चळवळीत आले. १९३९ मध्ये भाई माधवराव बागल यांनी शेतकऱ्यांचा मोर्चा काढला, त्यात माधवराव भोसले सहभागी झाले होते. ते शिवाजी पेठेतील. त्यांच्यामुळे अनेक सहकारी या चळवळीत ओढले गेले. तेथेच राष्ट्रसेवा दलाची शाखा त्यांनी सुरू केली.
बावडेकर वाड्याच्या पलीकडील झाडीत चळवळीतील ज्येष्ठांच्या सभा व्हायच्या. पहिलवान भीमराव जाधव, श्रीराम चिंचलीकर, हरिभाऊ धर्माधिकारी, नाना धर्माधिकारी, प्रभाकर कोरगावकर येत. पुढे बावडेकर तालीम, वरुणतीर्थ तलावाच्या पश्चिमेस साळोखे हे शारीरिक शिक्षण आणि बौद्धिक घेऊ लागले. उभा मारुती चौकात श्रीपती चव्हाण, पत्नी बायनाबाई चव्हाण, मुलगी सुशीलाबाई, निवृती आडूरकर सूत कातत असत.
कोल्हापूरसह सातारा, सांगली, तसेच अन्य जिल्ह्यांतील स्वातंत्र्यसैनिक भूमिगत होऊन पंत अमात्य बावडेकर आखाड्यात मुक्कामाला असायचे. या तालमीतूनच संदेश दिले जायचे. बैठकीतून पुढील आंदोलनाची दिशा ठरविली जायची.
पहिली प्रभातफेरी पेठेत
१९४१ मध्ये महायुद्ध झाले. सैन्यात भरती करण्यासाठी ब्रिटिश प्रचार करत होते. त्याला विद्यार्थी संघटनांचा विरोध होता. कोल्हापुरात बापू पाटील यांनी प्रभात फेरी काढण्याची जबाबदारी अण्णासाहेब चव्हाण यांच्यावर सोपवली. ३० जानेवारी आणि १४ नोव्हेंबरला पहिली प्रभात फेरी निघाली.