पंचगंगेत हजारो मासे तडफडले, पंचगंगा प्रदुषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2022 12:58 PM2022-01-21T12:58:01+5:302022-01-21T12:58:15+5:30
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे पंचगंगा प्रदुषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
कसबा बावडा : दूषित पाण्यामुळे ऑक्सिजन कमी पडल्याने कसबा बावडा येथील पंचगंगा नदीपात्रात हजारो माशांची तडफड होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे पंचगंगा प्रदुषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. असे प्रकार होत राहिल्यास प्रदुषणामुळे पंचगंगेतील जलचर नष्ट होण्याची भीती पर्यावरण तज्ञांकडून व्यक्त होत आहे.
कसबा बावड्यातील मळी परिसरातील नदीपात्रात हजारो माशांचे थवे अगदी संथगतीने तरंगताना आढळून आले. दूषित पाण्यामुळे हा प्रकार झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या जरी दिसत असले तरी पाणी तपासणीचा अहवाल आल्यानंतरच याचे खरे कारण कळू शकेल असे स्पष्टीकरण शिवाजी विद्यापीठातील पर्यावरण विभागाकडून देण्यात आले.
सध्या पंचगंगा नदी राजाराम बंधाऱ्याजवळही प्रदूषित झाल्याचे दिसते. पाण्याला काळसर, हिरवट रंग काही प्रमाणात आला आहे. ज्या ठिकाणी मासे तरंगताना दिसले तिथेही पाण्याचा रंग काळपट हिरवट आहे. नदीतील हजारो मासे तरंगतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने गुरुवारी येथे प्रदूषण महामंडळाच्या व मत्स्य व्यवसायाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली.
याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी डॉ. अर्जुन जाधव म्हणाले, नेमके मासे कशामुळे तरंगले हे आताच सांगू शकत नाही. सध्या पाण्याचा नमुना घेतला आहे. तो विद्यापीठाकडे पाठविण्यात आला आहे. येत्या दोन दिवसांत त्याचा अहवाल येईल. त्यानंतर नेमकी परिस्थिती समजेल.
ऑक्सिजन कमी पडू शकल्याने, वातावरणातील नैसर्गिक बदल, माशांच्या शरीरामध्ये बदल होऊ शकतात, पाण्यातील काही नैसर्गिक बदल, दूषित पाणी, वॉटर बेड (पाण्यात काहीतरी कुजण्याची घटना घडणे) आदी कारणांमुळे मासे तरंगू शकतात, असे मत्स्य व्यवसाय सहाय्यक विकास अधिकारी सतीश खाडे यांनी सांगितले.