धनगरवाड्यांवरील लोकांची पायपीट कमी होणार, सोईसुविधांसह रोजगार निर्मिती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2023 10:38 AM2023-01-01T10:38:09+5:302023-01-01T10:39:17+5:30
सेवा निलयंम फाउंडेशनचा उपक्रम
इंदुमती गणेश
कोल्हापूर : राधानगरी, शाहुवाडीसारख्या दुर्गम भागातील धनगरवाडे म्हणजे साधी काडेपेटी आणायची असेल, तरी ६ किलोमीटरची पायपीट... दळण आणणे, किराणा माल, वस्तूंची दुरुस्ती कोणतेही काम असो, दूरवरचा प्रवास केल्याशिवाय पर्याय नाही, पण ही पायपीट आता कमी होणार आहे... येथील नागरिकांसाठी वाड्यांवरच किराणा मालाचे दुकान, गिरणी, वस्तूंची विक्री व दुरुस्ती केंद्र सुरू करून रोजगारनिर्मिती केली जाणार आहे. सेवा निलयंम फाउंडेशन या संस्थेने त्यासाठी पुढाकार घेतला आहे.
गेल्या चार वर्षांपासून कार्यरत असलेली सेवा निलयंम ही संस्था जिथे कमी तिथे आम्ही या उद्देशाने विशेषत: प्रामुख्याने दुर्गम भागातील वाड्यावस्त्या, वंचितांसाठी काम करते. सन २०१९ साली आलेल्या महापुरातील नागरिकांना वाचवायचे असो किंवा कोरोना आपत्तीच्या काळात रोज २०० लोकांना जेवण पुरवायचे असो, सॅनिटायझर, मास्क, औषधे धान्याचे किट घरपोच करायचे असो, दिवाळीचे साहित्य भेट देणे अशा कामांसाठी संस्था कायम लोकांच्या मदतीला पुढे येते.
राधानगरी तालुक्यातील म्हासुर्ली किंवा रातांबीचा येथील धनगरवाडे असो किंवा शाहुवाडी तालुक्यातील दुर्गम भागात आजही धनगरवाड्यांवरील नागरिकांचे हाल संपलेले नाही. आयुष्य सगळे तेथेच खर्ची घातलेले लोक गावठाणात येऊन राहायला तयार नसतात. हे वाडे गावापासून इतके दूर असतात की, दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी करायच्या असल्या, तरी त्यांना किमान पाच-सहा किलोमीटर चालत यावे लागते. या ठिकाणी अजूनही रस्त्यांची सोय नाही. पावसाळ्यात या वाड्यांचा गावांशी संपर्कही तुटतो. गुडघाभर चिखल आणि पावसाने दैना उडविलेली असते. त्यांचा हा जगण्याचा संघर्ष कमी कसा करता येईल, यासाठी सेवा निलयंम फाउंडेशन सातत्याने काम करते. दळणाची सोय व्हावी, यासाठी काही महिन्यांपूर्वी आटाचक्की(गिरण) देण्यात आली. त्यामुळे महिलांचा त्रास कमी झाला. त्याचप्रमाणे, पुढील वर्षात टप्प्याटप्प्याने धनगरवाड्यांवरील लोकांसाठी रोजगार निर्मिती करून दिली जाणार आहे. सगळ्यांना सोईस्कर पडेल, अशा ठिकाणी किराणा मालाचे दुकान सुरू करून देणे, गिरण सुरू करणे, सायकल दुरुस्तीचे साहित्य देणे असे लघुउद्योग सुरू करून दिले जाणार आहेत.