Kolhapur: येत्या विधानसभेला कागलमध्ये 'मविआ'तील माजी आमदार महायुतीच्या उमेदवाराला मदत करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 12:02 PM2024-08-05T12:02:21+5:302024-08-05T12:05:59+5:30
मागील विधानसभा निवडणुकीत संभाजी भिडे गुरुजी हे देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घेऊन आले होते की..
साके : आमचा भाजपला विरोध आहे,परंतु मंत्री हसन मुश्रीफ यांना नाही. जनसामान्यांचा विकास पाहिजे आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांना मदत करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असे प्रतिपादन माजी आमदार संजय घाटगे यांनी केले. साके, ता. कागल येथील विविध विकासकामांच्या लोकार्पण व उदघाटन कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. पालकमंत्री हसन मुश्रीफ, गोकुळचे संचालक अंबरिष घाटगे उपस्थित होते.
संजय घाटगे म्हणाले, गत विधानसभा निवडणुकीत मी मुश्रीफांकडून पैसे घेऊन निवडणूक लढवल्याचे काही लोकांनी आरोप केले. हसन मुश्रीफ तुम्ही शपथ घेऊन सांगा की एक रुपयाही तुम्ही मला दिला आहे काय? आणि दिला तरीही तो मी घेणार नाही. मागील विधानसभा निवडणुकीत संभाजी भिडे गुरुजी हे देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घेऊन आले होते की, तुम्ही माघार घ्या, तुम्हाला विधानपरिषदेचे आमदार करतो. पण उद्धव ठाकरे यांनी मला विश्वासाने उमेदवारी दिली होती. त्यांचा विश्वासघात करून मला विधान परिषदेचे आमदार काय कोणतेच पद नको.
हसन मुश्रीफ म्हणाले, संजय घाटगे यांनी घेतलेल्या निर्णयाचे मी स्वागत करतो. त्यांनी निवडणूक लढवायला पाहिजे होती. परंतु त्यांनी यापूर्वीच निवडणूक न लढविण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे त्यांची अडचण मी समजू शकतो. मी संजय घाटगे यांना कोणत्याही निवडणुकीत एक रूपायाही कधी दिला नाही हे शपथपूर्वक सांगतो.