आगामी विधानसभेसाठी कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला, 'या' मतदारसंघांची होऊ शकते अदलाबदल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 04:47 PM2024-06-18T16:47:40+5:302024-06-18T17:28:27+5:30

महाविकास आघाडी म्हणून प्रामाणिकपणे लढण्याचा तिन्ही पक्षांचा ठाम निर्धार

The formula of Mahavikas Aghadi has been decided for the upcoming assembly in Kolhapur district | आगामी विधानसभेसाठी कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला, 'या' मतदारसंघांची होऊ शकते अदलाबदल

आगामी विधानसभेसाठी कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला, 'या' मतदारसंघांची होऊ शकते अदलाबदल

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचा धुरळा खाली बसतो न बसतो तोच आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. सध्या तरी जागा वाटप आणि संभाव्य उमेदवार यांची महाविकास आघाडीकडून चाचपणी सुरू झाली आहे. तिन्ही पक्ष आपापल्या पातळीवर सर्वेक्षण करून जागावाटपावर चर्चा करणार आहेत. एक-दोन जागा इकडे-तिकडे होतील; पण महाविकास आघाडी म्हणून प्रामाणिकपणे लढण्याचा तिन्ही पक्षांचा ठाम निर्धार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच महाविकास आघाडीची बैठक मुंबईत पार पडली. त्यामध्ये एकत्रित लढण्यावर आणि मतदार संघाचे सर्वेक्षण करून जागावाटपासंदर्भात चर्चा करण्याचे ठरले आहे. जेव्हा आघाडी होत असते तेव्हा ज्या मतदारसंघात ज्या पक्षाचे आमदार आहेत, ती जागा त्या पक्षाला सोडण्याचा; तसेच जेथे घटक पक्षाचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर असतो ती जागा त्या पक्षाला दिली जाते, हा एक राजकीय संकेत आहे.

हाच न्याय यंदा होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी लावला गेला तर काँग्रेस पक्षाला चार, ‘उबाठा’ला तीन व राष्ट्रवादीला तीन जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे जिल्ह्यात चार आमदार, राष्ट्रवादीचे दोन, शिवसेनेचा एक, जनसुराज्य पक्षाचा एक, तर अपक्ष दोन असे आमदार आहेत. त्यामुळे काँग्रेसला चार जागा सोडाव्याच लागणार आहेत; मात्र काँग्रेसला कोल्हापूर किंवा राधानगरी यापैकी एक मतदारसंघ घ्यावा लागेल. राष्ट्रवादीला तीन, तर ‘उबाठा’ तीन मतदारसंघ मिळायला पाहिजेत. बदललेल्या राजकीय परिस्थितीनुसार दोन-तीन जागांची अदलाबदल करावी लागणार आहे.

आघाडीबाबत योग्य खबरदारी : पाटील

  • महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्यावर आम्ही तिन्ही पक्ष ठाम आहोत; परंतु कोण किती जागा लढविणार याची जाहीर चर्चा होणार नाही. वाद वाढणार नाहीत, याची खबरदारी आम्ही घेतली आहे, असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
  • तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून जागावाटपाचा निर्णय घेतील. त्यामुळे काँग्रेस अमुक जागा लढणार, राष्ट्रवादी, उबाठा अमुक जागा लढणार याला आता काही अर्थ नाही; मात्र एक नक्की आहे की, महाविकास आघाडीकडून नव्यांना संधी मिळेल. सभागृहात देखील नवीन टीम दिसेल, असे पाटील यांनी सांगितले.
  • सांगलीच्या निवडणुकीवरून झालेले समज, गैरसमज बाजूला केले जातीत. राज्यात महायुतीची सत्ता येणे हेच तिन्ही पक्षांचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे वाद घालत न बसता एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाऊ, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.


मतदारसंघ - सध्याचा पक्ष - संभाव्य पक्ष
इचलकरंजी - अपक्ष - राष्ट्रवादी
शिरोळ - अपक्ष - उबाठा
शाहूवाडी - जनसुराज्य - उबाठा
हातकणंगले - काँग्रेस - काँग्रेस
कोल्हापूर उत्तर - काँग्रेस - काँग्रेस किंवा उबाठा
कोल्हापूर दक्षिण - काँग्रेस - काँग्रेस
करवीर - काँग्रेस - काँग्रेस - काँग्रेस
कागल - राष्ट्रवादी काँग्रेस - राष्ट्रवादी किंवा उबाठा
राधानगरी - शिवसेना - उबाठा किंवा काँग्रेस
चंदगड - राष्ट्रवादी काँग्रेस - राष्ट्रवादी

Web Title: The formula of Mahavikas Aghadi has been decided for the upcoming assembly in Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.