Kolhapur Crime: बालिंगा दरोड्यातील चौघे मध्य प्रदेशातील, शोधासाठी पोलिसांना विशेष परिश्रम घ्यावे लागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 03:55 PM2023-06-12T15:55:05+5:302023-06-12T15:58:00+5:30
अटकेतील दोघांना गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी
कोल्हापूर : बालिंगा (ता. करवीर) येथील कात्यायनी ज्वेलर्सवर भरदिवसा दरोडा टाकणाऱ्या टोळीतील चार दरोडेखोर मध्य प्रदेशातील असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली. पसार असलेला स्थानिक संशयित कोपार्डे (ता. करवीर) गावचा असून, या पाच जणांच्या अटकेसाठी पोलिस पथकांचे प्रयत्न सुरू आहेत.
अटकेतील संशयित सतीश सखाराम पोहाळकर (वय ३७, रा. कणेरकर नगर, फुलेवाडी, कोल्हापूर) आणि विशाल धनाजी वरेकर (वय ३२, रा. कोपार्डे) या दोघांना न्यायालयात हजर केले असता, त्यांची गुरुवारपर्यंत (दि. १५) पोलिस कोठडीत रवानगी झाली.
दरोड्यानंतर पसार असलेल्या पाच संशयितांपैकी चौघे मध्य प्रदेशातील आहेत. त्यातील एक संशयित एका गुन्ह्यात कळंबा कारागृहात होता. कारागृहातून मिळालेल्या त्याच्या माहितीच्या आधारावरून त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. त्याच्या मागावर पथके पोहोचल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांच्या अटकेनंतरच गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे पोलिसांच्या हाती लागणार आहेत.
कात्यायनी ज्वेलर्सचीच निवड का?
दरोड्याचा मुख्य सूत्रधार पोहाळकर स्वत: सराफ व्यावसायिक असल्यामुळे त्याला कात्यायनी ज्वेलर्सच्या व्यवसायाची माहिती होती. या ज्वेलर्समध्ये दागिने मोठ्या प्रमाणात आहेत. शिवाय रोकडही मोठ्या प्रमाणात हाती लागू शकते, अशी पोहाळकरला खात्री होती. कात्यायनी ज्वेलर्सकडे ग्राहकांचा ओढा असल्यामुळे पोहाळकरचा व्यवसाय नुकसानीत होता. या दोन्ही कारणांमुळे त्याने दरोड्यासाठी कात्यायनी ज्वेलर्सचीच निवड केली, अशी माहिती तपासात समोर आली.
प्रत्यक्ष दरोड्यापासून दूर राहण्याचा स्थानिकांचा प्रयत्न
दरोड्यात एकूण सात जणांचा सहभाग होता. त्यापैकी चौघे मध्यप्रदेशातील होते. तिघा स्थानिकांनी प्रत्यक्ष दरोड्यात सहभाग घेतला नाही. मात्र, दरोड्याचा कट रचण्यापासून ते पळून जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्याचे काम या तिघांनी केले. दरोड्याचा प्लॅन अयशस्वी ठरला तर आपला सहभाग समोर येऊ नये, याची खबरदारी पोहाळकर आणि वरेकरने घेतली होती. मात्र, पोलिसांच्या तपासात त्यांचा भ्रम दूर झाला.
परप्रांतीय एकत्र की वेगवेगळे?
दरोड्याचा सूत्रधार पोहाळकर आणि वरेकर यांनी परप्रांतीय दरोडेखोरांना पुणे-बंगळुरू महामार्गावर कात्रजजवळ सोडल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर चौघे एकत्रच पुढे गेले की वेगवेगळ्या दिशांनी गेले याची माहिती नाही. ते वेगवेगळ्या दिशांना गेले असल्यास त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांना विशेष परिश्रम घ्यावे लागणार आहेत.