विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला जिवदान, चार दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर सुखरूप बाहेर काढलं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 03:49 PM2022-04-07T15:49:55+5:302022-04-07T15:50:32+5:30
सरुड : सरुड येथे ३५ फुट खोल विहीरीत पडलेल्या एका कोल्ह्याला वन विभागाच्या पथकामुळे जिवदान मिळाले. गेली चार दिवस ...
सरुड : सरुड येथे ३५ फुट खोल विहीरीत पडलेल्या एका कोल्ह्याला वन विभागाच्या पथकामुळे जिवदान मिळाले. गेली चार दिवस विहिरीत अडकून पडलेल्या या कोल्ह्याला वन विभागाच्या पथकाने सुखरुप बाहेर काढले.
चार दिवसापुर्वी सरुड येथील बिरदेव माळ परिसरातील रघुनाथ रोडे - पाटील यांच्या विहीरीमध्ये हा कोल्हा पडल्याचे तेथील स्थानिक शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पाटील यांनी त्वरीत वन विभागाला याची माहीती दिली. माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. परंतू विहिरीला पायऱ्या नसल्याने कोल्हयाला बाहेर काढण्यास अडथळे येत होते.
वनकर्मचाऱ्यांनी विहिरीत लाकडी शिडी टाकूनही कोल्ह्याला बाहेर काढण्यात अपयश आले. अखेर आज, गुरुवारी सकाळी प्राणी मित्र किरण खोत यांनी विहिरीत उतरून मोठ्या धाडसाने कोल्ह्याला पकडले व पोत्यात घालून त्यास बाहेर काढले. दरम्यान या कोल्ह्याची मलकापूर येथील पशुवैधकीय अधिकांऱ्याकडुन तपासणी करण्यात आली आहे. त्याच्या सदृढ असल्या बाबतचा अहवाल प्राप्त होताच त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे वनविभागाकडुन सांगण्यात आले.
मलकापूर वन विभागाचे वनक्षेत्रपाल अमित भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल संजय कांबळे, वनरक्षक रुपाली पाटील, आशिष पाटील, अक्षय चौगुले, तसेच प्राणीमित्र किरण खोत व वन सेवक शंकर लव्हटे, संजय चौगुले, महिपती कुडित्रेकर यांच्या पथकाने या कोल्ह्याला सुखरूप बाहेर काढून जिवदान दिले.