आई कुणा म्हणू मी? आई घरी न दारी.!, अपघाताने हिरावले बालिकेचे मातृछत्र; कोल्हापुरातील दुर्दैवी घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 05:48 PM2022-12-12T17:48:33+5:302022-12-12T17:49:11+5:30

आई-आई म्हणून तिचा जप सुरूच होता. माझी आई कुठेय? या तिच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे धाडस कुणातच नव्हते.

The girl mother was lost in an accident near Shivaji University in Kolhapur | आई कुणा म्हणू मी? आई घरी न दारी.!, अपघाताने हिरावले बालिकेचे मातृछत्र; कोल्हापुरातील दुर्दैवी घटना

आई कुणा म्हणू मी? आई घरी न दारी.!, अपघाताने हिरावले बालिकेचे मातृछत्र; कोल्हापुरातील दुर्दैवी घटना

googlenewsNext

उद्धव गोडसे

कोल्हापूर : आपल्या डोळ्यांसमोरच रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आपली आई वाचवा- वाचवा म्हणून आकांत करतेय, अशी कल्पना जरी केली तरी हृदयात कालवाकालव होते. अजाणत्या वयात आईचं छत्र हरवलं तर जगण्याचा सूरच बिघडतो. नेमकं असंच झालंय उजळाईवाडीतील (ता. करवीर) इशिताच्या बाबतीत. अवघ्या चार वर्षांच्या चिमुरडीची आई अपघाताने हिरावून घेतली आणि आई कुणा म्हणू मी? आई घरी न दारी... असं म्हणण्याची वेळ निष्पाप इशितावर आली.

रविवारचा दिवस आणि संकष्टी चतुर्थीचा योग म्हटल्यावर उजळाईवाडीतील (दादू चौगुलेनगर) शीतल सतीश कवडे आणि वैजयंता अशोक पाटील यांनी कोल्हापुरात ओढ्यावरील गणपतीच्या दर्शनासाठी जाण्याचा बेत ठरवला. चार वर्षांची मुलगी इशिताला घेऊन या दोघी दुचाकीवरून बाहेर पडल्या. शहरात जातोयच तर नातेवाईकांनाही भेटून घेऊ, असे म्हणत टेंबे रोडवर पाटील काकूंच्या बहिणीच्या घरी गेल्या. पाहूणचार झाला. गप्पा- टप्पा झाल्या. त्यानंतर देशदर्शन आटोपून घरी परतताना घात झाला. शिवाजी विद्यापीठ चौकात भरधाव ट्रकने पाठीमागून धडक दिली आणि या अपघातात इशिताची आई गंभीर जखमी झाली.

नशिब बलवत्तर म्हणून इशिता आणि पाटील काकू बचावल्या; पण या अपघातातून इशिताच्या डोक्यावरील मातृछत्र परमेश्वराने हिरावून घेतले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आपली आई चिमुरड्या इशितानं पाहिली. रुग्णवाहिकेतून तिला सीपीआरमध्ये पाठवतानाही आईसोबतच बसण्याचा इशिताचा हट्ट थांबला नाही. सीपीआरमध्ये पोहोचल्यावर घाबरलेल्या इशिताचे डोळे लुकलुकत होते.

स्वत:च्या नाकावर झालेली जखम, दातातून आलेलं रक्त याचं काहीच भान तिला नव्हतं. तिला फक्त आई हवी होती. तिची नजर फक्त आईचा शोध घेत होती. काही वेळातच तिचे बाबा सीपीआरमध्ये पोहोचले; पण पत्नीची गंभीर अवस्था अन् कावरीबावरी झालेली इशिता पाहून त्यांना अधिकच गलबलून आलं. नि:शब्द झालेली बाबाची अवस्थाच सारं काही सांगून जात होती. काही वेळाने जखमी शीतल कवडे गेल्याचे समजले आणि सगळ्यांच्याच नजरा इशितावर पडल्या. आई समजून घेण्याआधीच गेलेली आई शोधण्याचा चिमुरडीचा प्रयत्न मात्र सुरूच होता...

कल्पनेपलिकडचे दु:ख

जखमी आईवर उपचार सुरू असताना काही नातेवाईक इशिताची समजूत घालत होते. खरे तर त्यांनाही समजुतीचे शब्द सूचत नव्हते. आई- आई म्हणून तिचा जप सुरूच होता. माझी आई कुठेय? या तिच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे धाडस कुणातच नव्हते.

Web Title: The girl mother was lost in an accident near Shivaji University in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.