कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात वर्षभर पुरेल इतका औषधसाठा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 16:38 IST2023-10-03T16:38:30+5:302023-10-03T16:38:53+5:30
जिल्हा नियोजनकडून अनुदान

कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात वर्षभर पुरेल इतका औषधसाठा
कोल्हापूर : कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार शासकीय रुग्णालयात वर्षभर पुरेल इतका औषधसाठा असल्याचे शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांनी सांगितले. दरम्यान, नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर सर्वच जिल्ह्यांतील औषधसाठ्याचा आढावा वैद्यकीय विभाग आणि आरोग्य विभागाकडून घेण्यात येत आहे.
हाफकिन संस्था व वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने गेल्या काही वर्षांपासून औषध पुरवठा होत नाही. अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच प्रकारच्या औषधांचा पुरवठा ही संस्था करते. गेल्या वर्षभरात फक्त चारच प्रकारच्या औषधांचा पुरवठा हाफकिनने कोल्हापूरला केला आहे. सध्या वैद्यकीय शिक्षण संचालनालय (डीएमईआर) सर्वच रुग्णालयांना औषध पुरवठा करणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे.
कोल्हापूरला वर्षभरात सुमारे चार ते पाच कोटी रुपयांच्या औषधांची आवश्यकता असते. यासाठी चार कोटी रुपयांचे अनुदान मिळते. सध्या पावणेदोन कोटी रुपयांच्या निधीतून औषधांची खरेदी झालेली आहे.
कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात काही औषधे तीन महिना, तर काही औषधे एक महिना पुरतील इतकी उपलब्ध आहेत. मात्र, तो सध्या पुरेशा प्रमाणात आहे. औषधांच्या साठ्यासंदर्भात दर महिन्याला बैठकीत आढावा घेण्यात येतो.
हृदयविकार, श्वानदंश, सर्पदंशावरील औषधांचा पुरेसा साठा
कोल्हापूर जिल्ह्यात श्वानदंश आणि सर्पदंशाचे प्रमाण अधिक असल्याने यावर उपचार करण्यासाठी लागणाऱ्यो रेबीजसारख्या औषधांचा साठा फक्त ‘सीपीआर’मध्येच आहे. याशिवाय हृदयविकारावरील काही औषधे तत्काळ लागतात. त्याचाही पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे संबंधित विभागाने सांगितले.
जिल्हा नियोजनकडून अनुदान
कोल्हापुरातील रुग्णालयांसाठी लागणाऱ्या औषधांची खरेदी करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. जिल्हा नियोजन समितीमार्फत उपलब्ध हाेणाऱ्या अनुदानातून याची खरेदी होते.