सरकारने नवीन संचमान्यता आदेश रद्द करावा, आमदार जयंत आसगावकर यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 03:39 PM2024-06-29T15:39:07+5:302024-06-29T15:40:26+5:30
'या आदेशामुळे विद्यार्थी संख्या कमी होणार असून, बहुजन समाजातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळणार नाही'
कोल्हापूर : राज्य सरकारने १५ मार्च २०२४ रोजी काढलेला संचमान्यता आदेश तत्काळ रद्द करावा, अशी मागणी आमदार जयंत आसगावकर यांनी शुक्रवारी अधिवेशन काळात शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली.
आमदार आसगावकर यांनी मंत्री केसरकर यांची भेट घेऊन याप्रश्नी सखोल चर्चा केली. ते म्हणाले, हा नवीन आदेश बऱ्याच शाळांना मारक ठरणारा आहे. या आदेशामुळे मुख्याध्यापकपद, तसेच शाळेतील शिक्षकांची पदे कमी होणार आहेत. याचा मराठी माध्यमांच्या शाळांना मोठा फटका बसणार आहे.
या आदेशामुळे विद्यार्थी संख्या कमी होणार असून, बहुजन समाजातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळणार नाही. हा आदेश रद्द करून पूर्वीप्रमाणे संचमान्यता करावी. यावर मंत्री केसरकर यांनी हा आदेश रद्द करण्यासाठी शिक्षण आयुक्त यांच्याकडे अभिप्राय मागविला असून, लवकरच त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.