लम्पी औषधोपचारांचा खर्च सरकार करणार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 12:01 PM2022-09-27T12:01:53+5:302022-09-27T12:02:22+5:30

लम्पी त्वचारोगाने हैराण झालेल्या शेतकऱ्यांचे पशुधन जगले पाहिजे यासाठी जिल्ह्याला एक कोटीचे अर्थसाहाय्य

The government will bear the cost of lumpy medicines, Minister Radhakrishna Vikhe Patal gave the information | लम्पी औषधोपचारांचा खर्च सरकार करणार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली माहिती

लम्पी औषधोपचारांचा खर्च सरकार करणार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली माहिती

Next

हातकणंगले : लम्पी त्वचारोगाने हैराण झालेल्या शेतकऱ्यांचे पशुधन जगले पाहिजे यासाठी जिल्ह्याला एक कोटीचे अर्थसाहाय्य शासनाकडून दिले आहे. अजून अर्थसाहाय्य देण्यास शासन तयार आहे. जिल्ह्यामध्ये ९३ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. लम्पी रोगावर नियंत्रण आणण्यासाठी पशूंची आंतरराज्य बंदी, बाजारबंदी, पशुधन वाहतूक बंदी केल्याने लम्पी रोग आटोक्यात आलेला आहे, असे मत राज्याचे महसूल आणि पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी हातकणंगले येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले.

हातकणंगले तालुक्यातील लम्पी रोगाची लागण झालेल्या मौजे वडगाव, हेरले आणि अतिग्रे गावांतील जनावरांच्या गोठ्यांना सोमवारी राज्याचे पशुसंवर्धन व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेटी देऊन शेतकऱ्यांचे पशुधन वाचले पाहिजे यासाठी प्रत्यक्ष जाऊन आढावा घेतला. या भेटीनंतर हातकणंगले तहसील कार्यालयामध्ये आढावा बैठक घेतली.

बैठकीत खासदार धैर्यशील माने यांनी तालुक्यामध्ये पशुवैद्यकीय डॉक्टरांची कमतरता आहे. त्यामुळे जनावरांची हेळसांड होत असल्याचे मत व्यक्त केले.

आमदार राजू बाबा आवळे यांनी तालुका मोठा असल्याने शासकीय पशुसंवर्धन विभागाची सेवा वेळेत मिळत नाही तरी खासगी डॉक्टरांना काम करण्याची परवानगी मिळावी, असे मत मांडले. आमदार प्रकाश आवाडे यांनी पुढील महिन्यामध्ये साखर कारखाने चालू होणार आहेत. जिल्हा जिल्ह्यातून जनावरे येणार आहेत. त्यांचे लसीकरण होणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले. माजी आ. राजीव आवळे यांनी लम्पी रोग झालेल्या जनावरांसाठी स्वतंत्र निवारण केंद्रे सुरू करावीत. जिल्ह्यात वैद्यकीय सेवा कमी पडत आहे त्यावर लक्ष द्यावे, असे मत मांडले.

जि. प. सदस्य अरुणराव इंगवले यांनी दुष्काळी स्थितीमध्ये जशा छावण्या सुरू केल्या होत्या त्याचप्रमाणे या रोगावरही शासनाने छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी यावेळी केली.

या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी राहुल रेखावर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, मिरज प्रांत समीर शिंगटे, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार, कल्पना ढवळे, शिरोळचे जि. प. सदस्य अशोक माने, प्रसाद खोबरे यांच्यासह अधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकशी करून कारवाईचे आदेश

अतिग्रे येथे पशुसंवर्धन विभागाकडून जनावरांना लसीकरण करण्यात आले. यावेळी लसीकरण करताना एकच सुई वापरण्यात आली. त्यामुळे गावातील घरोघरी लम्पी रोगाचा प्रसार झाला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले.

तानाजी सावंत यांचे बोलणे तोडमोड करून दाखविले

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. मंत्री तानाजी सावंत यांनी मराठा समाजाच्या आरक्षणावर कोणतेही वादग्रस्त वक्तव्य केलेले नाही. त्यांचे बोलणे मोडतोड करून दाखविले आहे. मी आरक्षण समितीचा राज्य कार्याध्यक्ष आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आमचे शासन नेहमीच प्रयत्नशील आहे. राज्य शासन मराठ्यांना आरक्षण मिळवून देणार, असे मत यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केले.

Web Title: The government will bear the cost of lumpy medicines, Minister Radhakrishna Vikhe Patal gave the information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.