शिवाजी विद्यापीठाच्या ‘आयपीआर पेपर’ची राज्यपालांनी घेतली दखल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 11:38 AM2022-09-08T11:38:19+5:302022-09-08T11:40:11+5:30
राजभवन सचिवालयाने याबाबत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांना पत्र पाठविले आहे
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षेतील विधी शाखेच्या सत्र सहाच्या इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राइट्स (आयपीआर) या विषयाच्या प्रश्नपत्रिका अत्यंत कठिण्य पातळीवर तयार केल्याची तक्रार काही विद्यार्थ्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. त्याची दखल त्यांनी घेतली. राजभवन सचिवालयाने याबाबत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांना पत्र पाठविले आहे. त्यात या तक्रारीच्या अनुषंगाने योग्य कार्यवाही करण्याची सूचना करण्यात आली आहे.
या अभ्यासक्रमाच्या तृतीय आणि पाचव्या वर्षाच्या आयपीआर विषयाची प्रश्नपत्रिका विद्यापीठाने जाणीवपूर्वक अत्यंत कठीण स्वरूपाची काढल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कुलगुरू यांच्याकडे अर्जाद्वारे केली होती. या पेपरवेळी सांगलीतील एका विधी महाविद्यालयामध्ये गैरप्रकार झाल्याचे कारण सांगून विद्यापीठाने या पेपरची २६ दिवसानंतर पुनर्परीक्षा घेतली. मात्र, या पेपरबाबत विद्यार्थ्यांनी तक्रार अर्ज केले होते. त्याची विद्यापीठ प्रशासनाने दखल घेतली नाही.
विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रार दाखल होत असतील, तर त्यावेळी या प्रकरणांमध्ये प्रशासनाकडून विद्यापीठाच्या पॅनलवरील विषय तज्ज्ञांची समिती नेमून याबाबत अहवाल मागविणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात विद्यापीठाने तक्रारदारांच्या तक्रारीच्या अनुषंगाने कोणतेही ठोस पाऊल उचललेले दिसून आले नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. त्यावर सांगली जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याने याबाबत ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राज्यपालांकडे तक्रार केली. त्याची दखल घेऊन राजभवन सचिवालयाकडून कुलगुरू डॉ. शिर्के यांना पत्र पाठविण्यात आले आहे.
दोषींवर कडक कारवाई करावी
‘आयपीआर’ विषयाची पुनर्परीक्षा घेतली; परंतु या विषयाची प्रश्नपत्रिका ही केंद्र शासनाच्या पेपर सेटर गाइडलाइन्सप्रमाणे होती किंवा नाही याची चौकशी व्हावी. आमचा जाणीवपूर्वक मानसिक छळ करणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.