नुतन वर्षाची सुरुवात शिवमय होणार; छत्रपती शिवरायांवरील महानाट्य ‘शिवगर्जना’चे कोल्हापुरात विनामूल्य आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 03:46 PM2023-12-29T15:46:40+5:302023-12-29T15:53:04+5:30

आशिया खंडातील सर्वात मोठे महानाट्य, कोल्हापूरचे भूमिपुत्र

The grand play Shivagarjana on Chhatrapati Shiva Raya is organized for free in Kolhapur | नुतन वर्षाची सुरुवात शिवमय होणार; छत्रपती शिवरायांवरील महानाट्य ‘शिवगर्जना’चे कोल्हापुरात विनामूल्य आयोजन

नुतन वर्षाची सुरुवात शिवमय होणार; छत्रपती शिवरायांवरील महानाट्य ‘शिवगर्जना’चे कोल्हापुरात विनामूल्य आयोजन

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाच्या ३५० व्या वर्षपूर्तीनिमित्त राज्य सरकारकडून राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवरायांवरील महानाट्याच्या प्रयोगाचे आयोजन केले जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दिनांक ५, ६ व ७ जानेवारी २०२४ रोजी या महानाट्याचे आयोजन शहरात गांधी मैदान येथे केले जाणार आहे. हे महानाट्य पाहण्यासाठी  सर्वांसाठी मोफत प्रवेश असणार आहे. महानाट्य पाहण्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची माहिती जनसामान्यांना करून देण्यासाठी ३ प्रयोगांचे आयोजन एकाच ठिकाणी सलग तीन दिवस होणार आहेत. याबाबत झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांसह अशासकीय सदस्यांची समिती गठित केली आहे. यासाठी वाहनतळ, रस्ते मार्ग, आपत्ती व्यवस्थापन, बैठक सुविधा, जनजागृती आदि विषयांवर चर्चा व नियोजन करण्यात आले.  

या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे सूचनेनुसार संबंधित विभागप्रमुखांची नियोजन बैठक संपन्न झाली.  या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, अतिरिक्त आयुक्त रवीकांत अडसूळ, प्रकल्प संचालक मनीषा देसाई, उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, तहसीलदार स्वप्नील रावळे, प्रमोद पाटील, आदित्य बेडेकर यांचेसह इतर अधिकारी व अशासकीय सदस्य उपस्थित होते. 

आशिया खंडातील सर्वात मोठे महानाट्य, कोल्हापूरचे भूमिपुत्र

हे महानाट्य कोल्हापुरातील भूमिपुत्रांचे असून आजवर या महानाट्याने संपूर्ण भारतात हिंदी आणि मराठी अश्या दोन्ही भाषेत 85 प्रयोग यशस्वीरित्या सादर केले आहेत, भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या प्रमुख उपस्थितीतही  हे महानाट्य सादर झाले आहे. या महानाट्यात 250 कलाकारांसह हत्ती, घोडे, उंट, बैलगाडी यांचा प्रत्यक्ष वापर होणार आहे. तर 140 फूट लांब आणि 60 फूट उंच असे भव्य दिव्य नेपथ्य असणार आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याला नेत्रदिपक आतिषबाजीही असणार आहे, तसेच लोकनृत्य आणि लोककलांची व्यवस्थित सांगड घातली आहे. महानाट्याच्या निर्मात्या रेणू यादव असून दिग्दर्शन स्वप्नील यादव यांनी केले आहे. 12व्या शतकापासून ते शिवजन्मापर्यंत  आणि शिवजन्मापासून ते शिवराज्याभिषेका पर्यंत पूर्ण इतिहास मांडण्यात आला आहे.

Web Title: The grand play Shivagarjana on Chhatrapati Shiva Raya is organized for free in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.