पन्हाळागडावरील तोफा तोफगाड्यावर होणार विराजमान, अनेक वर्षे होत्या दुर्लक्षित
By सचिन भोसले | Published: March 17, 2023 04:40 PM2023-03-17T16:40:40+5:302023-03-17T16:44:06+5:30
अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या तोफांना नवसंजीवनी देण्यासाठी शिवराष्ट्र परिवाराच्या वतीने लाकडी कलाकुसर असलेल्या तोफगाड्या बनविण्यात आल्या
कोल्हापूर : पन्हाळगडावरील नगरपालिकेच्या दारातील पाच तोफा अनेक वर्षे दुर्लक्षित राहिल्या आहेत. त्यांना नवसंजीवनी देण्यासाठी शिवराष्ट्र परिवाराच्या वतीने लाकडी कलाकुसर असलेल्या तोफगाड्या बनविण्यात आल्या आहेत. त्या उद्या, रविवारी सकाळी शहरातून शोभायात्रा काढून पन्हाळ्यावर विराजमान होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रशांत साळुंखे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
साळुंखे म्हणाले, शिवराष्ट्र परिवार, महाराष्ट्रच्या वतीने गेली ३० वर्षांपासून पन्हाळगड-पावनखिंड मोहिमेसह दर रविवारी गड संवर्धन केले जाते. त्याला अभिनेते सयाजी शिंदे यांचे बळ लाभत आहे. पन्हाळा नगरपालिकेच्या दारातील ५ तोफांना तोफगाडे तयार करण्याचे काम केले आहे. या तोफा ऊन, वारा, पावसाला तोंड देत आहेत. त्यांचे संर्वधन होणे काळाची गरज आहे. या जाणिवेतून बाभळीच्या जुन्या लाकडामध्ये राजाराम व बाळकृष्ण सुतार या पिता-पुत्रांनी तोफगाडे कलाकुसरीने बनविले आहेत.
या तोफगाड्यांची रविवारी सकाळी प्रथम मिरजकर तिकटी, महाद्वार रोड, पापाची तिकटी आणि गंगावेश येथपर्यंत शोभायात्रा काढली जाणार आहे. त्यानंतर त्या पन्हाळगडावर विराजमान होणार आहेत. या प्रसंगी शहाजीराजे, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, न्यायाधीश बी.डी. कदम, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, उत्तम जाधव, पन्हाळा नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा रूपाली धडेल, विजय पाटील, आसीफ मोकाशी आदी उपस्थित राहणार आहेत.