Kolhapur: पुराची पातळी वाढणार, पाणी नाकातोंडात जाणार; ठेकेदाराच्या मग्रुरीला ‘राष्ट्रीय महामार्ग’ची संमती
By राजाराम लोंढे | Updated: March 12, 2025 16:00 IST2025-03-12T15:59:52+5:302025-03-12T16:00:12+5:30
शेतकरी जेल भरो आंदोलनाच्या तयारीत

छाया-आदित्य वेल्हाळ
राजाराम लोंढे
कोल्हापूर : बालिंगे पुलाच्या पश्चिमेकडे दहा फुटाने मातीचा भराव घातल्याने पुराच्या पाण्याची उंची ७ फुटाने वाढणार आहे. ही उंची वाढत असताना त्यापेक्षा चार पटीने पाणी विस्तारणार असून, तेवढी घरे आणि जमीन पाण्याखाली जाणार आहे. संपूर्ण गावेच विस्थापित होणार असून, राष्ट्रीय महामार्गाने भरावात घातलेल्या मातीबरोबर पुराचे पाणीही शेतकऱ्यांच्या नाकातोंडात जाणार आहे. करवीर व पन्हाळा तालुक्यांतील शेतकरी जेल भरो आंदोलनाच्या तयारी आहेत.
ठेकेदार बड्या माजी केंद्रीय मंत्र्यांचा निकटवर्तीय असल्याने तो ग्रामस्थांना दाद देत नाही.
रस्त्याच्या दर्जाबाबत अनेक तक्रारी आहेत. राष्ट्रीय महामार्ग म्हणता, मग त्याच्या निकषानुसार रस्ता झाला का? बालिंगे ते खांडसरी दरम्यान शिवतेज ढाब्याजवळ तर रस्ता चक्क एकपाकी केला आहे. सोयीनुसार बाजूपट्ट्यांची रुंदी ठेवली आहे. पुढे रस्ता सुरू असतानाच मागे रस्ता उखडला आहे. बालिंगेकडील बाजूला तर आरसीसीची भिंत उभी केल्याने पाणी तुंबून ते बालिंगे गावात घुसणार आहे.
एकीकडे रस्त्याचा दर्जा सुमार असताना पुलाच्या दोन्ही बाजूला मातीचा भराव टाकून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केले जात आहे. आताच पन्नास गावे निम्मी स्थलांतरित करावी लागतात. जुलैनंतर ‘कुंभी’, ‘राधानगरी’, ‘तुळशी’, ‘कोदे’ ही धरणे भरली की त्यातून विसर्ग वाढतो. त्यात लहरी हवामानामुळे एकाच दिवशी गगनबावड्यासारख्या ठिकाणी १०० ते १५० मिलिमीटर पाऊस पडतो. अशा वेळी भोगावतीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग खूप वेगाने होतो. तो बालिंगे पुलातून त्याच गतीने पुढे सरकला नाहीतर मागील गावांना जलसमाधीच मिळणार आहे.
कोगे पुलाच्या भराव्याने तुंबी वाढली
चार-पाच वर्षांपूर्वी कोगे (ता. करवीर) येथे कुंभी नदीवर पूल बांधताना पिलर कमी करून मातीचा भराव टाकला, तेव्हापासून करवीर व पन्हाळा तालुक्यांतील गावांत पाणी शिरण्याचे प्रमाण वाढले आहे. आता, बालिंगे पुलाच्या भराव्याने ग्रामस्थांच्या नाकातोंडात पाणी जाणार आहे.
खासदार साहेब, जरा लक्ष द्या
महामार्ग कामाच्या दर्जासह मातीच्या भराव्याबाबत गेले तीन-चार महिने नागरिक व शेतकरी टाहो फोडत आहेत. राष्ट्रीय महामार्ग विभाग दखल घेईना आणि ठेकेदार जुमानत नाही. महापुराने गावांना जलसमाधी मिळाल्यानंतर सांत्वनासाठी लोकप्रतिनिधी येणार का? खासदार साहेब, जरा लक्ष द्या, असा संताप जनतेतून व्यक्त होत आहे.
बाजूपट्ट्यांवर व्यावसायिकांचे फलक
बालिंगे ते कळेपर्यंत या मार्गावर हॉटेलसह इतर व्यावसायिक आहेत. अगोदरच काँक्रिटीकरणाच्या बाजूपट्ट्याला लागून गटर्स केली आहेत. व्यावसायिकांचे फलक बाजूपट्ट्यांवर असल्याने रस्ता एकेरीच सुरू राहतो. त्यात मध्यभागी दुभाजक नसल्याने अपघाताचे प्रमाणही वाढले आहे.
पाटबंधारेने ‘एनओसी’ दिली कशी?
बालिंगे ते दोनवडे फाटा येथपर्यंत पुराच्या काळात सात फुटाने पाणी वाहते. प्रतिसेकंद किती घनफूट पाण्याचा विसर्ग त्यावेळी हाेतो, याची माहिती पाटबंधारे विभागाकडे आहे. ढिगाऱ्यामुळे तेवढे पाणी थांबून मागे दाबत नेणार आहे. मग, महामार्ग विभागाने ‘पाटबंधारे’ची ‘एनओसी’ घेतली का आणि कशी दिली? अशीही विचारणा होत आहे.
२०२१ च्या महापुरात बाधित कुटुंबे
तालुका - २०२१ बाधित - नवीन रस्त्यामुळे संभाव्य बाधित
करवीर - ४५०० - ७७००
पन्हाळा - १६०० - २५५०
अगोदरच कळे आणि कोगे पुलांच्या भराव्यामुळे गावे पुराच्या विळख्यात अडकली आहेत. या पुलामुळे तर शेतकरी उद्ध्वस्तच होणार आहे. हा भराव काढून तेथून संपूर्ण पिलरचा पूल उभा करावा, अन्यथा आम्हाला रस्त्यावरची लढाई करावी लागेल. - बाळासाहेब खाडे (संचालक, गोकुळ)
रस्ता व पुलाचे काम नागरिकांच्या सोयीसाठी नव्हे, गैरसोयीसाठीच आहे. पुलाचे पिलर व मोऱ्यांची संख्या कमी करून सरकार पैसे वाचवत आहे. पण, दरवर्षी या भराव्यामुळे होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी जे पैसे द्यावे लागतील, तेवढे आताच खर्ची केले तर मनस्ताप कमी होईल. - बाबासाहेब देवकर (माजी सदस्य, जिल्हा परिषद)
दोन्ही बाजूला आरसीसी भिंत घालून भराव टाकल्याने पन्नास-साठ गावे विस्थापित होणार आहेत. ठेकेदार व महामार्ग विभागाला जनतेचा आक्राेश समजत नाही, पालकमंत्र्यांनी यावर मार्ग काढला तर ठीक, अन्यथा जनआंदोलन उभा करू. - अमर पाटील (शिंगणापूरकर)