Kolhapur: ए.एस ट्रेडर्स फसवणुकीचा तपास कुठपर्यंत आला?; १४ जूनपूर्वी प्रतिज्ञापत्र द्या, उच्च न्यायालयाचे अधिकाऱ्यांना निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 04:11 PM2024-05-13T16:11:44+5:302024-05-13T16:12:08+5:30
फिर्यादीची तपासाबद्दल नाराजी
कोल्हापूर : ए.एस. ट्रेडर्स कंपनीने केलेल्या फसवणुकीचा तपास कुठपर्यंत आला, याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने तपास अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र, १० मे रोजी झालेल्या सुनावणीत तपास अधिकाऱ्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले नाही. याची गंभीर दखल घेऊन न्यायाधीश अमित बोरकर यांनी तपास अधिकाऱ्यांना १४ जूनपूर्वी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, फिर्यादी रोहित ओतारी यांनी उच्च न्यायालयात अर्ज सादर करून तपासाबद्दल नाराजी व्यक्त केली.
कमी कालावधित मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून ए.एस. ट्रेडर्स कंपनीने गुंतवणूकदारांनी कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू असून, कंपनीचा प्रमुख लोहितसिंग सुभेदार याच्यासह १५ संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. गुन्ह्याशी संबंधित इतर २० हून अधिक संशयितांचा शोध सुरू आहे. यातील अमित शिंदे, बाळासो धनगर आणि साहेबराव धनगर यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली.
सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी तपास अधिकाऱ्यांकडे आजपर्यंत झालेल्या तपासाबद्दल प्रतिज्ञापत्राची मागणी केली. ते न मिळाल्याने १४ जूनपूर्वी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे निर्देश तपास अधिकाऱ्यांना दिले. संशयितांच्या जामीन अर्जावर पुढील तारखेस सुनावणी होणार आहे. फिर्यादी रोहित ओतारी यांच्या मार्फत ॲड. जयंत बारदेस्कर यांनी, तर सरकार पक्षाच्या वतीने ॲड. वीरा शिंदे यांनी काम पाहिले.
फिर्यादीवर दबाव नको
फिर्यादी ओतारी यांनी तपासातील त्रुटींबद्दल न्यायालयात नाराजी व्यक्त केली. याबाबत अर्ज देऊन त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले. यावर बोलताना न्यायाधीश बोरकर यांनी पोलिसांकडून तपास अधिकाऱ्यांवर दबाव येऊ नये, अशा सूचना दिल्या.