कितीवेळा संवर्धन करणार, आता अंबाबाईची मूर्ती बदला; मुर्तीची मोठ्याप्रमाणावर झीज

By इंदुमती सूर्यवंशी | Published: September 21, 2022 05:37 PM2022-09-21T17:37:59+5:302022-09-21T17:38:22+5:30

अंबाबाईच्या मूर्तीची पूर्णत: झीज झाली असून २०१५ साली केलेल्या संवर्धन प्रक्रियेचाही मूर्तीवर फारसा परिणाम झालेला नाही.

The idol of Ambabai has been largely destroyed, Need to change the idol | कितीवेळा संवर्धन करणार, आता अंबाबाईची मूर्ती बदला; मुर्तीची मोठ्याप्रमाणावर झीज

कितीवेळा संवर्धन करणार, आता अंबाबाईची मूर्ती बदला; मुर्तीची मोठ्याप्रमाणावर झीज

googlenewsNext

इंदुमती गणेश

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मूर्तीचा चेहऱ्याचा भाग दुखावल्याने रविवारी तातडीने संवर्धन करण्यात आले आहे. पण मूर्तीची अवस्था आता संवर्धनापलीकडे गेली आहे, दरवेळी मूर्तीच्या नवीन भागाची झीज होते. पुरातत्त्वचे लोक गाभाऱ्याची दारे बंद करून घाईघाईने एका दिवसात टचअप करून जातात. पण आता देवीची मूर्ती बदलण्यासाठी देवस्थान समितीने पावले उचलावीत अन्यथा एक दिवस अनर्थ घडण्याची शक्यता आहे. नवरात्रौत्सवानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हा विषय अजेंड्यावर घेण्याची गरज आहे.

अंबाबाईच्या मूर्तीची पूर्णत: झीज झाली असून २०१५ साली केलेल्या संवर्धन प्रक्रियेचाही मूर्तीवर फारसा परिणाम झालेला नाही. संवर्धनानंतर सहा महिन्यात मूर्तीवर पांढरे डाग उठायला सुरूवात झाली होती. त्यानंतरही दर सहा महिन्यांनी सातत्याने देवीच्या मूर्तीवर टचअप करावे लागते. अनेकदा पुरातत्त्वच्या अधिकाऱ्यांची पुजाऱ्यांसोबतच चर्चा होते. परस्पर निर्णय घेऊन ते एका दिवसात काम पूर्ण करून जातात. देवस्थान समितीलाही कधीच विश्वासात घेतले जात नाही.

अचानक रविवारी अशी काय अडचण आली होती की तातडीने भाविकांसाठी दर्शन बंद करून मूर्तीचे संवर्धन करावे लागले याचाही विचार होणे गरजेचे आहे. आता या कामासाठी समितीसोबत अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही. फक्त जिल्हाधिकाऱ्यांना या विषयाची कल्पना देऊन विषय मिटवण्यात आला.

संवर्धनाच्या नावाखाली केला कारभार

अंबाबाईच्या मूर्तीवर तीन वेटोळ्यांचा नाग होता. पण २०१५ साली केलेल्या संवर्धनाच्यावेळी तो नाग हटवण्यात आला. आठ दिवसांनी मूर्ती खुली झाली ती नाग नसलेलीच. त्यावर पुरातत्त्वच्या अधिकाऱ्यांनी मूर्तीवर नाग होता हे आम्हाला दिसले नाही आणि कोणी सांगितले नाही. अशी स्वत:ची पाठराखण करून घेतली. त्याचवेळी मूर्तीची अशीच काळजी घेतली तर पुढे हजार वर्षे टिकेल असे सांगितले होते, पण प्रत्यक्षात तसे झालेले नाही.

भावना महत्त्वाची की मूर्तीची स्थिती आणि शास्त्र

  • मंदिर व मूर्तिशास्त्रानुसार दुखावलेल्या मूर्तीची कधीही पूजा केली जात नाही. पण अंबाबाईच्या या मूर्तीशी कोल्हापूरकरांच्या जोडलेल्या भावनांचा विचार करून इतकी वर्षे यावर निर्णय झाला नाही.
  • पण आता मूर्ती अशा अवस्थेत पोहोचली आहे की बदलणे भाग आहे. यापूर्वीही अंबाबाईची मूर्ती एकदा बदलण्यात आली असल्याचे दाखले पुराणग्रंथात मिळतात.
  • आता मूर्तीची स्थिती आणि शास्त्रानुसार निर्णय घेत मूर्ती बदलणे गरजेचे आहे.
     

अंबाबाईची मूर्ती जुनी असून झीज झाली आहे. कोरोनामुळे मूर्तीचे संवर्धन झाले नव्हते. त्यामुळे रविवारी तातडीच्या दुरुस्ती करण्यात आल्या. समितीकडे तज्ज्ञ व्यक्ती नसल्याने पुरातत्त्वच्या मार्गदर्शनाखाली काम केले जाते. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार मूर्तीबाबतचा निर्णय घेतला जाईल. - राहुल रेखावार, जिल्हाधिकारी कोल्हापूर

Web Title: The idol of Ambabai has been largely destroyed, Need to change the idol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.