व्यावसायिक पत्रांमुळे आजही पोस्टाच्या पेटीचे महत्त्व टिकून; निळा, हिरवा लाल रंगाच्या पेटीचा अर्थ काय?..जाणून घ्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 02:23 PM2023-04-22T14:23:48+5:302023-04-22T14:24:06+5:30

कोल्हापूर टपाल विभागांतर्गत जिल्ह्यात १३५३ टपाल पेट्या

The importance of the post office box continues today because of business letters | व्यावसायिक पत्रांमुळे आजही पोस्टाच्या पेटीचे महत्त्व टिकून; निळा, हिरवा लाल रंगाच्या पेटीचा अर्थ काय?..जाणून घ्या 

व्यावसायिक पत्रांमुळे आजही पोस्टाच्या पेटीचे महत्त्व टिकून; निळा, हिरवा लाल रंगाच्या पेटीचा अर्थ काय?..जाणून घ्या 

googlenewsNext

दीपक जाधव

कोल्हापूर : सध्याचे युग हे संगणकाचे असून, संवादासाठी मोबाइलची क्रांती झाली असून पत्राची जागा व्हाॅट्सअॅप, मेसेज, ई-मेलने घेतली आहे. कित्येक दिवसांचा प्रवास करून हाती पडणाऱ्या पत्रातील भावना काही सेकंदात समजू लागल्या असल्या तरी पोस्ट पेटीचे महत्त्व व्यावसायिक पत्रामुळे आजही टिकून आहे. कोल्हापूर टपाल विभागांतर्गत जिल्ह्यात १३५३ टपाल पेट्या आहेत.

एककाळ असा होता की, पंधरा पैशाचे पोस्ट कार्ड हेच ख्याली-खुशाली समजण्याचे प्रमुख माध्यम होते. त्याहून जास्त हितगूज करायचे असल्यास निळे आंतरदेशीय पत्र लिहिले जाई. त्यामुळे दुपारी जेव्हा केव्हा या पत्रांचे वितरण होई, त्याकडे कित्येकजण डोळे लावून बसलेले असत. आई-वडील मुलाच्या पत्राची वाट पाहत असत. पत्नी पतीच्या ख्याली-खुशालीसाठी आतूर असे. प्रेयसी प्रियकराच्या पत्रासाठी आसुसलेली असे.

ही सेवा इंग्रजांनी सुरू केली. लोक गंमतीने असेही म्हणायचे की इंग्रजांनीच ही व्यवस्था घालून दिली म्हणून ती आजही इतक्या चांगल्या पद्धतीने सुरू आहे. तीच आम्हा भारतीयांनी सुरू केली असती तर पोस्ट पेटीजवळ एक गार्डधारी पोलिस उभा करावा लागला असता. कोण्या एका माणसाने मोबाइल नावाच्या यंत्राचा शोध लावला आणि पोस्टाचे महत्त्व कमी झाले. परंतु अजूनही ही सेवा आपले महत्त्व राखून आहे.

  • या टपाल पेट्या दररोज दुपारी ३ ते ४च्या दरम्यान उघडल्या जातात, त्याशिवाय रविवार व सुटीदिवशी ही उघडल्या जातात.
  • या पेट्यांमधून रोज साधारण १८ हजार पत्रे जातात व २१ हजार हजार पत्र येतात.


रंगाच्या पेटीचा अर्थ काय? 

निळा रंग - मेट्रो सिटींना जाणारे पत्र हे निळ्या रंगाच्या पेटीत टाकले जाते.
हिरवा रंग - जे स्थानिक पत्र असतील ती हिरव्या रंगाच्या पेटीत टाकली जातात.
लाल रंग - स्थानिक पत्राव्यतिरिक्त सर्व प्रकारचे साधे पत्र लाल रंगाच्या पेटीत टाकली जातात.


व्यावसायिक टपाल...

विमा पावती, विविध नोटीस, दैनिक, साप्ताहिक व पाक्षिक, विविध संस्थांचे अहवाल आदी.


आधुनिक क्रांतीच्या युगात संवाद, सुख-दु:खासाठी पाठवले जाणारे पत्र कमी झाले असून, सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून हा संवाद होत असला तरी व्यावसायिक पत्राचे प्रमाण वाढले आहे. -अर्जुन इंगळे, मुख्य डाकघर अधीक्षक, कोल्हापूर.
 

Web Title: The importance of the post office box continues today because of business letters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.