शेतकऱ्यांसाठी खुशखबर! नववर्षात 'प्रोत्साहन अनुदाना'चे पैसे खात्यावर जमा होणार; कोल्हापूर जिल्ह्यात 'इतके' लाभार्थी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 12:18 PM2022-12-31T12:18:15+5:302022-12-31T12:18:35+5:30
राज्य सरकारने ४४० कोटीचा निधी उपलब्ध करून दिला
कोल्हापूर : नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सोमवार (दि.२) पासून प्रोत्साहन अनुदान जमा होणार आहे. पहिल्या व दुसऱ्या यादीतील १ लाख ८६ हजार पात्र शेतकऱ्यांपैकी तब्बल १ लाख ८३ हजार लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे.
पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत ‘प्रोत्साहन’ अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. पहिल्या यादीत कोल्हापूर जिल्ह्यातील १ लाख २९ हजार ३१८ शेतकऱ्यांचा समावेश होता. त्यातील बहुतांशी शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळालेला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत दुसरी यादी आडकली होती. निवडणूक संपताच राज्य सरकारने ५७ हजार ३१० पात्र शेतकऱ्यांची यादी पाठवली आहे. त्याच्या आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत दोन्ही यादीतील १ लाख ८३ हजार शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले आहे. अद्याप तीन हजार शेतकऱ्यांनी प्रमाणीकरण केलेले नाही.
ज्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे, अशा दुसऱ्या यादीतील शेतकऱ्यांच्या खात्यावर सोमवार पासून अनुदानाचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे.
४४० कोटीचा निधी उपलब्ध
जिल्ह्यातील १ लाख ८६ हजार पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्यासाठी राज्य सरकारने ४४० कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यातील पहिल्या यादीतील शेतकऱ्यांना पैसे दिले आहेत. आता दुसऱ्या यादीतील पात्र शेतकऱ्यांसाठी प्रक्रिया सुरू होणार आहे.
त्रुटी दुरुस्तीचे कामही सुरू
जिल्ह्यात दोन्ही याद्यांमध्ये काही पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही. काही ठिकाणी बँकांची चूक आहे, तर काहींची तांत्रिक अडचणीमुळे पैसे मिळालेले नाहीत. अशा शेतकऱ्यांच्या त्रुटी दुरुस्त करण्याचे काम सहकार विभागाच्या पातळीवर सुरू आहेत.