कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रेरणादायी पुतळ्याला ९७ वर्षे पूर्ण, देशातील पहिले स्मारक
By संदीप आडनाईक | Published: April 12, 2024 12:23 PM2024-04-12T12:23:37+5:302024-04-12T12:24:15+5:30
संदीप आडनाईक कोल्हापूर : कोल्हापूरची शान असलेला दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा पूर्णाकृती भव्य पुतळा आज, शुक्रवार, ...
संदीप आडनाईक
कोल्हापूर : कोल्हापूरची शान असलेला दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा पूर्णाकृती भव्य पुतळा आज, शुक्रवार, दि. १२ एप्रिल २०२४ रोजी ९७ वर्षे पूर्ण करत असून, शताब्दी वर्षात पदार्पण करत आहे. कोल्हापूरच्या जनतेची प्रेरणा असलेला हा दसरा चौक आणि शाहू महाराजांचा पुतळा स्वाभिमानाच्या खुणा जपतो आहे.
राज्य सरकारने २०२२ मध्ये स्मृतिशताब्दी वर्ष साजरे केले आहे. दसरा चौकातील या पुतळ्यासमोर दरवर्षी जयंतीनिमित्ताने शाहूप्रेमी तसेच केंद्रीय आणि राज्यातील मंत्री जेव्हा जेव्हा कोल्हापुरात येतात तेव्हा तेव्हा या पुतळ्यासमोर नतमस्तक होत असतात. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कसबा बावडा येथील लक्ष्मीविलास पॅलेस येथे झाला आणि निधन ६ मे १९२२ रोजी झाले. त्यामुळे या पुतळ्याच्या रूपाने त्यांचे देशातील पहिले प्रत्यक्ष स्मारक उभारण्याचे काम त्यांचे थोरले कर्तबगार चिरंजीव राजाराम महाराज यांच्यामुळे झाले.
या पुतळ्यासाठी शाहूप्रेमींनी लोकवर्गणीतून एक लाख ४० हजार ७०० रुपये जमा केले होते. हा ब्राँझचा पुतळा मुंबईचे प्रसिद्ध शिल्पकार गणपतराव म्हात्रे यांनी तयार केला आहे. यासाठी ७५ हजारांवर खर्च झाला. पुतळ्याची उंची साडेआठ फूट असून, मस्तकावर मंदील आणि अंगात मराठेशाहीचा पायघोळ अंगरखा आहे. उजव्या हातात तलवार असून, दुसरा हात झग्यामध्ये आहे. मुंबईत तयार झालेला हा पुतळा रेल्वेने कोल्हापुरात आणला. रेल्वे स्थानकापासून दसरा चौकापर्यंत वाजत-गाजत मिरवणूक निघाली. तत्कालीन मुंबई प्रांताचे गव्हर्नर लेस्ली विल्सन यांच्या हस्ते याचे अनावरण झाले.
जन्मदिनांकाचा वाद
शाहू महाराजांचा जन्मदिनांकाचा वादही पूर्वी गाजला होता. पुतळ्याचे अनावरण झाले तेव्हा शिलालेखावर जुलै असा उल्लेख आहे. महाराजांचा जन्मदिवस २६ जून १८७४ असल्याचे अनेक पुरावे इतिहासकारांनी मान्य केले आहेत.
दसरा चौकातील शाहू महाराजांचा पुतळा तीन वर्षांत शताब्दी वर्षात पदार्पण करेल. हा सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा केला पाहिजे. हा देशातील पहिलाच पुतळा आहे. संसदेसह देशभरातील अनेक पुतळ्यांचे हा पुतळा मॉडेल आहे. शाहूंची चेहरेपट्टी, रुबाब, राजेशाही व्यक्तिमत्व या पुतळ्यामुळेच सर्वसामान्य जनतेच्या हृदयात विराजमान आहे. शाहू महाराजांना ज्यांनी प्रत्यक्ष पाहिलेले होते, त्यांनी तो घडविलेला आहे. तो वास्तवबोधी पुतळा आहे. या पुतळ्याच्या कोनशिलेवर असलेली तारीख चुकीची असली तरी त्यानंतर समिती नेमून राज्य सरकारने जून ही तारीख मान्य केली आहे. -डॉ. जयसिंगराव पवार, इतिहास संशोधक
शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचे स्मारक म्हणून दसरा चौकातील या दर्शनी भागातील पुतळ्याकडे पाहिले जाते. तत्कालीन गव्हर्नर त्यावेळी तीन दिवस दौऱ्यावर होते. सामाजिक समतेचा संदेश प्रस्थापित करण्याचा प्रयत्न या पुतळ्यांमधून दिला गेला आहे. ज्या चौपाळ्याच्या माळावर हा पुतळा उभारला तेव्हा पुतळ्यामागे घोड्याची पागा होती, सभोवती मराठा, जैन, लिंगायत, कायस्थ प्रभू, मुस्लीम बोर्डिंग उभारले होते. १९०१ मध्ये नंतर सीपीआरची इमारत उभारण्यात आली. -डॉ. विलास पोवार, इतिहास संशोधक