कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला, पुराचा विळखा कायम; दूध, भाजीपाला वाहतूक ठप्प
By राजाराम लोंढे | Published: July 26, 2024 05:37 PM2024-07-26T17:37:16+5:302024-07-26T17:42:15+5:30
‘राधानगरी’चे पाच दरवाजे खुले, पंचगंगा ४५.५ फुटांवर
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात आज, शुक्रवारी सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी पुराचा विळखा अद्याप कायम आहे. ‘राधानगरी’चे पाच स्वयंचलित दरवाजे खुले झाल्याने पंचगंगा ४५.५ फुटांवरून वाहत आहे. तब्बल ८३ मार्गांवर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. निम्मा जिल्हा पुराच्या पाण्याने वेढल्याने दूध, भाजीपाला आवकेसह जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे. कोल्हापूर शहरातील पूरबाधित भागात पाणी घुसू लागले असून, नागरिकांचे स्थलांतर सुरूच आहे.
गुरुवारी दिवसभर पावसाने अक्षरश: झोडपून काढले होते. धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस कोसळत असल्याने जलसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. राधानगरीचे सातही दरवाजे खुले झाले होते. पण शुक्रवारी सकाळपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. सकाळी आठ वाजता तर ऊन पडल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. पण दुपारनंतर पुन्हा रिपरिप सुरू झाली आहे.
राधानगरी धरणाचे दोन दरवाजे बंद झाल्याने आता विसर्ग प्रतिसेंकद ८६४० घनफुटांनी भोगावती नदीत येत आहे. त्यामुळे पंचगंगेची पातळी वाढत आहे. तब्बल ९२ बंधारे, ८३ मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
जिल्ह्यात २६५ मालमत्तांची पडझड
जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात एका सार्वजनिक, तर २६४ खासगी मालमत्तांची पडझड झाली होती. यामध्ये तब्बल ९८ लाख ३७ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहीती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
एसटीचे ४६ मार्ग बंद
महापुराचे पाणी रस्त्यावर आल्याने बुधवारी एसटीचे तब्बल ४६ मार्ग बंद राहिले आहेत. गेली तीन दिवस एसटीची चाके थांबल्याने मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.
दृष्टिक्षेपात
शुक्रवारचा पाऊस
दिवसभरातील सरासरी पाऊस : ६५ मिलिमीटर
पंचगंगेच्या पातळीत वाढ : १ फुटाने
सध्याची पातळी : ४५.५ फूट
बंधारे पाण्याखाली : ९२
मार्ग बंद : ८३
नुकसान : २६५ मालमत्ता
नुकसानीची रक्कम : ९८ लाख ६२ हजार