कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी, पण भीती कायम; ‘राधानगरी’ ९० टक्के भरले, ८३ बंधारे पाण्याखाली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 11:50 AM2023-07-25T11:50:08+5:302023-07-25T12:25:05+5:30
नदीकाठच्या गावांचे स्थलांतर सुरूच : आणखी चार दिवस ऑरेंज अलर्ट
कोल्हापूर : जिल्ह्यात काल, सोमवारपासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यात राधानगरी धरण ९० टक्के भरल्याने कोणत्याही क्षणी स्वयंचलित दरवाजे खुले होणार असल्याने भीती कायम आहे. सुरक्षितता म्हणून जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांतील नागरिकांचे स्थलांतर सुरू केले आहे. आणखी चार दिवस जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला असून, पंचगंगेची पातळी ४०.२ फुटांपर्यंत पोहोचली आहे. तब्बल ८३ बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.
रविवारी रात्रभर व सोमवारी सकाळी पावसाने पुन्हा जोरदार बॅटिंग सुरू केली. त्यानंतर दिवसभर उघडझाप राहिली. धरण क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत असल्याने पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. राधानगरी धरण ९० टक्के भरले आहे. या धरणातून वीजनिर्मितीसाठी १४०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्याचबरोबर ‘वारणा’सह इतर छोट्या धरणातून कमीअधिक प्रमाणात विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नद्यांच्या पाण्यांना फूग आहे. सतर्कता म्हणून नदीकाठच्या गावातील नागरिकांचे स्थलांतर सुरू केले आहे. तब्बल ८३ बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू असली तरी काही गावांना पुराच्या पाण्यामुळे बेटाचे स्वरूप आले आहे. तेथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
कासारी नदीतून बैलगाडी वाहून गेली
कसबा ठाणे (ता. पन्हाळा) येथे कासारी नदीच्या पुराच्या पाण्यात बैलगाडी वाहून केली. यामध्ये दोन बैलांचा मृत्यू झाला आहे.
चिखली, आंबेवाडीतील नागरिकांचे स्थलांतर
पंचगंगेच्या पुराचा तडाखा बसणाऱ्या आंबेवाडी, प्रयाग चिखलीसह सर्वच नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर करणे सुरू आहे. पुराचे पाणी अद्याप गावात घुसले नसले तरी दक्षता म्हणून स्थानिक प्रशासनाने संभाव्य पूरबाधित कुटुंबांचे सक्तीने स्थलांतर सुरू केले आहे.
दुधगंगा धरण निम्मे भरले
दुधगंगा धरणातून यंदा ६ टीएमसी पाणी अधिक सोडल्याने हे धरण भरणार की नाही? याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. धरण क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत असल्याने हे धरण निम्मे भरले आहे.
जिल्ह्यातील ७१ मार्ग बंद
जिल्ह्यातील १४ राज्य, २५ प्रमुख जिल्हा मार्ग, १३ इतर जिल्हा मार्ग, तर १९ ग्रामीण मार्ग असे ७१ मार्ग पुराच्या पाण्यामुळे बंद आहेत.
‘कुंभी’ ८० टक्के भरले
सावर्डे : कुंभी धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, ८० टक्के पाणीसाठा झाला आहे. सोमवारी दिवसभरात या परिसरात ८४ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याने धरण कोणत्याही क्षणी भरू शकते. कुंभीमधून सध्या प्रतिसेकंद ४००, कोंदे धरणातून ९३६ घनफूट पाण्याचा विसर्ग कुंभी नदीत होत आहे. त्यामुळे पुराचे पाणी झपाट्याने वाढत असून, नदीकाठच्या नागिरकांनी दक्षता घेऊन स्थलांतरित व्हावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी अजिंक्य पाटील यांनी केले आहे.