..त्यावेळी महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा हेतू होता, मंत्री दीपक केसरकरांचा गौप्यस्फोट
By समीर देशपांडे | Published: November 3, 2022 06:36 PM2022-11-03T18:36:25+5:302022-11-03T18:44:03+5:30
बच्चू कडू आणि रवि राणा यांच्यातील वादाबाबत केसरकर म्हणाले, ..तर निर्णय घ्यावा लागेल
कोल्हापूर : आम्ही जेव्हा पक्षातून बाहेर पडलो त्या परिस्थितीचा गैरफायदा घेवून राज्यात दंगली घडवण्याचा अनेकांचा हेतू होता असा गौप्यस्फोट शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. ते कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
केसरकर म्हणाले, या दरम्यान आम्ही जी मनापासून भूमिका मांडली, आमच्यावर झालेला अन्याय मांडला, वस्तुस्थिती सांगितली त्यावर महाराष्ट्राने विश्वास ठेवला म्हणून दंगली झाल्या नाहीत. पुढे ते म्हणाले, आमच्यावर १०० वेळा तेच तेच खोटे बोलून आरोप करणाऱ्यांचे ढोंग लवकरच उघडकीस आणणार आहे.
जेव्हा आम्ही बाहेर पडलो. त्यावरून खूप आरोप केले जात आहेत. जे आमच्या पक्षात नव्हते असेही काहीजण वाट्टेल ते घरबंध सोडून बोलत आहेत. छोट्या छोटया गोष्टींचे भांडवल केले जात आहे. ज्या चुकीच्या गोष्टींना हे जबाबदार आहेत त्याची उलट जबाबदारी आमच्यावर ढकलली जात आहे. म्हणूनच वस्तुस्थिती महाराष्ट्रासमोर आणणार आहे. कारण आम्ही पक्ष सोडताना नेमकी काय वस्तुस्थिती होती हे पुन्हा एकदा सर्व महाराष्ट्राला समजले पाहिजे.
पार्टी म्हणून निर्णय घ्यावा लागेल
बच्चू कडू आणि रवि राणा यांच्यातील वादाबाबत केसरकर म्हणाले, तडजोड केल्यानंतर जर त्याचा सन्मान राखला जात नसेल तर पार्टी म्हणून निर्णय घ्यावा लागेल. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील. तो अधिकार माझा नाही. सुषमा अंधारे यांच्याबद्दल आदर आहे. परंतू त्यांच्या आरोपांना मी उत्तर देणार नाही असेही केसरकर म्हणाले.