Kolhapur: ‘बिद्री’ची चौकशी हे प्रकाश आबीटकर यांचेच पाप, के. पी. पाटील यांचा आरोप
By राजाराम लोंढे | Published: June 24, 2024 05:32 PM2024-06-24T17:32:28+5:302024-06-24T17:34:21+5:30
'आता विधानसभेचे घोडामैदान दूर नाही, जनताच हिशेब चुकता करेल'
कोल्हापूर : गेली दहा वर्षे ‘राधानगरी’च्या सामान्य माणसाची दिशाभूल करुन पन्नास खोक्याच्या आमिषाने गुवाहाटीला धूम ठोकणाऱ्यांना ‘बिद्री’च्या निवडणूकीत सभासदांनी चारीमुंड्या चित केले. त्या रागापोटी रात्रीच्या वेळी ‘बिद्री’ साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाची चौकशी केली. कारखान्याच्या ६५ हजार सभासद व ऊस उत्पादकांच्या कष्टावर उभारलेल्या कारखान्याची बदनामी करण्याचे पाप आमदार प्रकाश आबीटकर यांनी केल्याचा आरोप ‘बिद्री’साखर कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार के. पी. पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.
के. पी. पाटील म्हणाले, सत्तेचे दहा वर्षे विकास कामे कमी आणि बिद्रीच्या प्रगतीला अडथळा जास्त अशी कालकीर्द आमदार आबीटकर यांची राहिली. केवळ बिद्री आणि के. पी. पाटील यांच्या द्वेषाने पछाडलेल्या आबीटकर यांनी गेल्या दोन पंचवार्षिक मध्ये दिवस आणि रात्र बिद्रीची प्रगती कशी रोखता येईल यासाठीच ते शासन दरबारी प्रयत्न केले. अल्पभूधारक शेतकऱ्याला सभासद होता यावे यासाठी आम्ही केलेल्या प्रयत्न त्यांनी न्यायप्रविष्ट केला. बिद्रीच्या प्रगतीचा शिलेदार ठरलेला सहवीज प्रकल्पाला अडचणीत आणण्याची भूमिका घेतली. इथेनॉल प्रकल्पाचे इरादा पत्र, लायसन कोणी आडवले हे कारखान्याच्या सभासदांना माहीती आहे. विस्तारीकरण मंजुरीच्या फायली सत्तेच्या जोरावर तब्बल दोन वर्ष निर्णयाविना अडकवून ठेवल्या. टेस्ट ऑडिटसाठी संबंधित अधिकाऱ्यांच्यावर सत्तेचा गैरवापर करून दबाव टाकला.
गुवाहाटी रिटर्न आमदारांना जनतेच्या मनातील खदखदची जाणीव झाल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्यानेच ते कुरघोडीचे राजकारण करत आहेत. त्यातूनच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना सत्तेच्या जोरावर दडपशाहीने बिद्रीची तपासणी करण्यास भाग पाडले. त्यांनी कितीही चौकशा करु देत, सत्य काय आहे ते लवकरच जनतेसमोरील येईल. असे के. पी. पाटील यांनी सांगितले.
सभासदांनीच योग्य मुहूर्त काढला
पावसाचे कारण पुढे करत ‘बिद्री’ची निवडणूक सत्तेच्या जोरावर लांबणीवर टाकली. पण, सभासदांनीच योग्य मुहूर्त काढून कारखान्याच्या चिमणीवर वाकडी नजर टाकणाऱ्यांना योग्य जागा दाखवल्याचे के. पी. पाटील यांनी सांगितले.
विधानसभेला हिशेब चुकता..
देशात नावलौकिक मिळवलेल्या ‘बिद्री’ कारखान्याची जेवढी बदनामी करता येईल, तेवढी प्रकाश आबीटकर यांनी केली. आता विधानसभेचे घोडामैदान दूर नाही. त्या निवडणूकीत ‘राधानगरी’ची जनता त्यांचा हिशेब चुकता करतील, असा विश्वास के. पी. पाटील यांनी व्यक्त केला.