कोल्हापुरात उमेदवाराच्या वयाचा मुद्दा १५ वर्षांनंतर पुन्हा चर्चेत
By भारत चव्हाण | Published: April 8, 2024 12:04 PM2024-04-08T12:04:11+5:302024-04-08T12:05:19+5:30
मतदार याबाबत काय भूमिका स्वीकारतात, ही उत्सुकता
भारत चव्हाण
कोल्हापूर : निवडणुकीत कोणता मुद्दा कधी उसळी घेईल आणि त्यावरून उठणारे मोहोळ कोणत्या दिशेला जाईल सांगता यायचं नाही. काही वेळा हेच मुद्दे मतदारांना रुचले नाहीत तर ते अंगलटही येतात. याचे अनुभव यापूर्वी कोल्हापूरकरांना आले आहेत. पंधरा वर्षांपूर्वी म्हणजेच २००९ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांच्या वयाचा मुद्दा उपस्थित झाला होता तसाच तो आता २०२४च्या निवडणुकीत सुद्धा उपस्थित झाला आहे. त्यामुळे मतदार याबाबत काय भूमिका स्वीकारतात, ही उत्सुकता लागून राहिलेली आहे.
शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांचे वडील स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक दोन वेळा खासदार झाल्यानंतर वयाचा विचार करून २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी नाकारली. त्यांच्या ऐवजी नव्या दमाच्या तरुण असलेल्या संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी दिली. त्यामुळे सदाशिवराव मंडलिक यांनी बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. स्वाभिमान दुखावलेले मंडलिक पेटून तर उठलेच शिवाय त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनीही मंडलिकांचा स्वाभिमान जपण्यासाठी कंबर कसली. प्रचार शिगेला पोहोचला.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना मंडलिक यांचे बंड रुचले नव्हते. त्यांना प्रचाराच्या दरम्यान मंडलिकांचे उट्टे काढायचे होते. त्यापद्धतीने शरद पवार यांनी प्रचाराच्या दरम्यान बिंदू चौकात झालेल्या जाहीर सभेत मंडलिक यांची अवहेलना केली होती. ‘बैल म्हातारा झाला आहे, त्याला आता बाजार दाखवायला पाहिजे,’ असे वक्तव्य शरद पवार यांनी सभेत केले. सदाशिवराव मंडलिक यांचे वय तेव्हा ७५ वर्षे होते, तर त्यांचे प्रतिस्पर्धी संभाजीराजे छत्रपती यांचे वय होते अवघे ३८ वर्षे.
शरद पवारांनी मंडलिकांच्या वयाचा मुद्दा काढून अवमान केल्याने मंडलिकांचे स्वाभिमानी कार्यकर्ते अधिक कामाला लागले. वयाचा मुद्दा तेव्हा मतदारांनाही रुचला नाही, त्यांनी ७५ वर्षांच्या मंडलिक यांना निवडून दिले. मंडलिक यांना निवडणुकीत ४ लाख २८ हजार ८२ मते मिळाली तर संभाजीराजे छत्रपती यांना ३ लाख ८३ हजार २८२ इतकी मते मिळाली.
शाहू छत्रपती यांचे वय ७६ वर्षे, मंडलिक ६० चे
आता होत असलेल्या निवडणुकीत स्वर्गीय मंडलिक यांचे पुत्र संजय मंडलिक तर संभाजीराजे छत्रपती यांचे वडील शाहू छत्रपती निवडणूक लढवित आहेत. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शाहू छत्रपतींच्या वयाचा मुद्दा उपस्थित केला आहे. महाराजांबद्दल आम्हाला आदर आहे; परंतु या वयात त्यांनी निवडणुकीत उतरायला नको होते, असे मुश्रीफ म्हणाले आहेत. त्यामुळे पंधरा वर्षांनंतर पुन्हा एकदा वयाचा मुद्दा उपस्थित झाला आहे. शाहू छत्रपती यांचे वय सध्या ७६ वर्षे इतके आहे, तर संजय मंडलिक यांचे वय ६० वर्षे आहे. त्यामुळे मतदार वयाला महत्त्व देतात की छत्रपती घराण्याला, हे लवकरच स्पष्ट होईल.