Kolhapur News: राजाराम कारखान्याची निवडणूक लांबणीवर टाकण्यासाठीच अर्हता दिनांकाचा मुद्दा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 01:09 PM2022-12-31T13:09:34+5:302022-12-31T13:09:59+5:30
‘राजाराम’ कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत संपून जवळपास अडीच वर्षे झाली
कोल्हापूर : कसबा बावडा (ता. करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यांची निवडणूक कोणत्याही परिस्थित लांबणीवर टाकण्यासाठीच कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे. त्यातूनच मतदार यादीचा अर्हता दिनांकाचा मुद्दा उपस्थित केला जात असला तरी कायद्याने आता बदलणे अडचणीचे आहे. त्यामुळे ३१ ऑक्टोबर २०२२ ही अर्हता दिनांक निश्चित करून व्यक्ती सभासदांची नावे ऑक्टोबर २०२० तर संस्था सभासदांची नावे ऑक्टोबर २०१९ पर्यंतची पात्र ठरणार आहेत.
‘राजाराम’ कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत संपून जवळपास अडीच वर्षे झाली आहेत. कोरोनानंतर सभासद यादीवरून ही निवडणूक लांबणीवर पडली आहे. सत्तारूढ गटाने कार्यक्षेत्राबाहेरील सभासद वाढवल्याची हरकत १३४६ सभासदांवर विरोधकांनी घेतली होती. साखर सहसंचालक, सहकारमंत्री, उच्च न्यायालयात हे सभासद अपात्र ठरले आहेत. त्यानंतर सत्तारूढ गटाने सर्वोच्च न्यायलयात दाद मागितली आहे. याबाबत बुधवारी (दि. ४) सुनावणी होत आहे. या सुनावणीमध्ये निकाल अपेक्षित आहे.
न्यायालयाची निवडणुकीला स्थगिती नसताना निवडणूक प्रक्रिया थांबवली कशी? याबाबत विरोधी गटाने साखर सहसंचालकांकडे निवेदन देऊन विचारणा केली. यावर, शुक्रवारपर्यंत ‘ब’ वर्ग संस्था गटाची यादी मागवली जाईल, असे सांगण्यात आले. तोपर्यंत सत्तारूढ गटाने मतदार यादीची अर्हता दिनांक बदलून तो ३१ मार्च २०२३ करावा, अशी मागणी केली. यामागे कारखान्याची निवडणूक लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न आहे.
मात्र, ११ नोव्हेंबर २०२१ च्या सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशानुसार अर्हता दिनांक निश्चित करून प्रक्रिया सुरू झाली आहे. न्यायालयात याच कालावधीतील वाढीव सभासदांचा वाद सुरू असल्याने सत्तारूढ गटाच्या मागणी मान्य होण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे अर्हता दिनांक ३१ ऑक्टोबर २०२२ हीच राहणार हे निश्चित आहे.
अर्हता बदलली तर ९८ सभासद वाढणार
सत्तारूढ गटाच्या म्हणण्याप्रमाणे मतदार यादीची अर्हता दिनांक ३१ मार्च २०२३ केली, तर ९८ सभासद वाढणार आहेत.
दृष्टिक्षेपात ‘राजाराम’ कारखाना -
कार्यक्षेत्र : करवीर, राधानगरी, गगनबावडा, पन्हाळा, हातकणंगले.
व्यक्ती सभासद : १७३२०
संस्था सभासद : १४३